अमरावती : तलाठी ते मंडळ अधिकारी अशी रखडलेली पदोन्नती आणि कर्मचाऱ्यांना अद्ययावत लॅपटॉप, स्कॅनर, प्रिंटर पुरविण्यात होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात विदर्भ पटवारी संघाच्या जिल्हा शाखेने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनांतर्गत तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील लॅपटॉप, स्कॅनर व इतर सामग्री परत केली. त्यामुळे सात-बारा, आठ-अ आणि फेरफारचे दाखले मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना त्यामुळे त्रास सहन करावा लागणार आहे.
पदोन्नती देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती असते. या समितीला डिस्ट्रिक्ट प्रमोशन कमिटी (डीपीसी) म्हटले जाते. या समितीची वर्षातून एकदा बैठक घेऊन पदोन्नतीस पात्र असलेल्यांची यादी तयार केली जाते. परंतु गेल्या दोन वर्षात या समितीची एकही बैठक झाली नाही. त्यामुळे पदोन्नतीस पात्र असतानाही तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या पुढच्या संधी हुकल्या आहेत. तलाठ्यांमधून पुढे मंडळ अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांमधून पुढे नायब तहसीलदार अशी साखळी आहे. मात्र डीपीसी रखडल्यामुळे ही साखळीच विस्कळीत झाली आहे, असे विदर्भ पटवारी संघाचे म्हणणे आहे.
हेही वाचा : सावधान! शासकीय नोकरीचे आमिष दाखवणारी टोळी सक्रीय
तलाठ्यांमधून मंडळ अधिकारी या पदावर पदोन्नती देण्यासाठीची प्रक्रिया विदर्भात फक्त अमरावती जिल्ह्यात झाली नाही. नागपूर विभागातील सर्व जिल्हे आणि अमरावती विभागातील अकोला, बुलडाढा, वाशीम आणि यवतमाळ या चारही जिल्ह्यात ती पूर्ण केली. त्यामुळे तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.