अमरावती : मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने गेल्या सहा महिन्यांत ‘ऑपरेशन अमानत’अंतर्गत २ कोटी ७८ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे साहित्य प्रवाशांना परत केले. यामध्ये प्रवाशांचे हरवलेले किंवा विसरलेले सामान, मोबाईल फोन, लॅपटॉप, दागिने, रोख यांसारख्या मौल्यवान वस्तूचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाख रुपये किमतीचे सामान परत करण्यात आले. मुंबई विभागात ३७७ प्रवाशांचे १.६३ कोटी रुपयांचे सामान परत मिळवून देण्यात आले. नागपूर विभागात १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख रुपये, पुणे विभागात ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख रुपये तर सोलापूर विभागात ७२ प्रवाशांचे १३.९९ लाख रुपयांचे सामान परत करण्यात आले. एकूण ८५७ प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : नागपुरातील चिंचभवन रेल्वे उड्डाण पुलावरील वाहतूक पूर्ववत
रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ ) जवानांनी रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली. त्यांच्या मौल्यवान वस्तू प्रवाशांना परत मिळवून दिल्या आहेत. आरपीएफने एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मध्ये एकूण ८५७ प्रवाशांना त्यांचे सामान परत मिळवून दिले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.