अमरावती : महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तसेच अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने एका अज्ञात व्यक्तीने बनावट लेटरहेड व बनावट सही करून एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी संबंधित अज्ञात व्यक्तीच्या विरोधात पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली. गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका अज्ञात व्यक्तीने महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाने अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र पाठवले. मोर्शी येथील एका वरिष्ठ लिपिकावर कारवाई करण्यासंदर्भात हे पत्र आहे. हे पत्र बनावट स्वाक्षरी सह लेटरहेड वर दिले. टपालाद्वारे हे बनावट पत्र पाठवण्यात आले होते.
मात्र, जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी हे पत्र तपासले, त्यातील मजकुरावरून त्यांना संशय आला. लेटरहेड सह पालकमंत्री व महसूल मंत्र्यांची सही देखील बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
हा प्रकार समोर येताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी योगेश कोठेकर यांनी तत्काळ पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्याशी संपर्क साधून सविस्तर चर्चा केली आणि लेटरहेड व सही बनावट असल्याचे स्पष्ट केले.
संबंधित अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन तत्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश यावेळी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिले. हे बनावट पत्र गेल्या १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. त्यात वरूड नगर पालिकेतील एका लिपिकावर कारवाई करण्याचे सांगण्यात आले आहे. या लिपिकाने वरिष्ठांच्या वरदहस्ताने परस्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगर पालिका विभागात डेप्युटेशनने नेमणूक मिळवली.
पण, हा लिपिक तेथेही गायब असल्याची तक्रार आहे. हा लिपिक नागरिकांचे फोन उचलत नाही, दादागिरीची भाषा वापरतो, अशा अनेकांच्या तक्रारी आहेत. या लिपिकाची नेमणूक जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द करावी आणि त्याची हकालपट्टी करावी, असे या पत्रात नमूद करण्यात आले होते.
नगर पालिकेतील निम्मे कर्मचारी हे गायब असल्याचे त्यात नमूद आहे. नगर पालिका विभाग हा बोगस कर्मचाऱ्यांचा अड्डा झाला आहे, असाही उल्लेख या पत्रात आहे. पोस्टाद्वारे हे पत्र पाठविण्यात आले होते. हे पत्र बनावट असल्याचे उघड झाले. गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.