अमरावती : नवसारी मार्गावरील जवाहरनगरात भरदिवसा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. कार व दुचाकीवरून आलेल्या ८ ते १० लुटारूंनी पिस्तूलाच्या धाकावर सुवर्णकार वडील व मुलाला मारहाण करून त्याच्याजवळील ३० किलो चांदी असलेली बॅग हिसकाविली. यावेळी झालेल्या झटापटीत सुवर्णकाराने सोने व रोकड असलेली बॅग परिसरातील एका घरात फेकल्याने ती बचावली. हा थरार बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडला. लुटारूंना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
जवाहरनगर येथील रहिवासी अरविंद उत्तमराव जावरे (४५) यांचे नवसारी मार्गावर सराफा दुकान आहे. नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास ते वडील उत्तमराव जावरे (७५) यांच्यासह एका बॅगमध्ये सोने व रोख आणि दुसऱ्या बॅगमध्ये चांदी घेऊन दुचाकी क्रमांक एमएच २७ सीजी ८०५७ ने आपल्या दुकानात जात होते.
हेही वाचा : चंद्रपूर: ताडोबात रिसोर्टच्या नावावर फसवणूक
ते दोघे घरापासून काही अंतरावर पोहोचताच एका मंदिराजवळ कार व दोन दुचाकीने परिसरात दाखल होऊन त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या ८ ते १० लुटारूंनी अचानक अरविंद व त्यांचे वडील उत्तमराव यांना लाथ मारून खाली पाडले. त्यानंतर लुटारूंनी दोघांनाही घेरुन मारहाण सुरू केली. लुटारूंनी त्यांच्याजवळील दोन्ही बॅग हिसकाविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात चांगलीच झटापट झाली. या झटापटीत लुटारूंनी अरविंद यांच्या नाकावर पिस्तूलाच्या मुठीने मारून त्यांच्याजवळील ३० किलो चांदी असलेली बॅग हिसकाविली.
त्याचवेळी अरविंद यांनी दीड किलो सोने व जवळपास ३ लाख ५० हजारांचा रोकड असलेली बॅग परिसरातील एका नागरिकाच्या घरात फेकली. त्यामुळे सोने व रोकड बचावली. दरम्यान, हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर लुटारूंनी कार व दुचाकींनी तेथून पळ काढला. त्यानंतर घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार प्रशांत माने यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याबाबत माहिती मिळताच साहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव बचाटे, गुन्हे शाखेच्या सीमा दाताळकर यांनीही घटनास्थळ गाठून पाहणी केली.
हेही वाचा : छत्तीसगडमधील चकमकीत एका जहाल नेत्यासह ९ नक्षलावादी ठार
लुटमारीची ही घटना परिसरातील रहिवासी एक महिला आपल्या घराच्या वरच्या माळ्यावरून मोबाइलमध्ये कैद करीत होती. हा प्रकार लुटारूंच्या लक्षात आल्यावर त्यांनी सदर महिलेला पिस्तूलाचा धाक दाखवून धमकाविले. त्यामुळे घाबरलेली महिला जीवाच्या भीतीने घरात निघून गेली. कार व दुचाकीने जवाहरनगरात दाखल झालेले लुटारू सुवर्णकार अरविंद यांच्यावर पाळत ठेऊन होते.