अमरावती : हनुमान चालिसा ट्रस्टच्या वतीने मालखेड मार्गावरील हनुमान गढी येथे कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचे महाशिवपुराण सुरु असून यात शिवपुराणाच्या नावाखाली अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम राजाश्रयात होत आहे. गर्दी खेचण्यासाठी मंडपाच्या बाहेर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे बाबा यांची छायाचित्रे आयोजकांनी लावली आहेत. ही महापुरुषांची विटंबना असल्याने महापुरुषांचे फोटो काढून टाकावेत, असा आक्षेप अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी उपसर्वाधिकारी रुपराव वाघ यांनी घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “मी प्रश्न अदानींना विचारले, की उत्तर त्यांचे चमचे…”, उद्धव ठाकरेंची टीका

देशातील अंधश्रद्धेला मुळासकट उखडून टाकण्यासाठी विज्ञानवादाचा अंगिकार करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगे बाबा, डॉ. पंजाबराव देशमुख यांनी आपली हयात खर्च केली. त्यांच्याच जिल्ह्यात त्यांची छायाचित्रे या मंडपात लावण्‍यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यास न करता उत्तीर्ण होण्यासाठी शहद लावून बेलपत्र शंकराच्या पिंडेवर चिपकवायला सांगून उलटी गंगा अवतीर्ण करु पाहणाऱ्या कथावाचक प्रदीप मिश्रांवर महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळी जादू अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी सुध्दा रुपराव वाघ यांनी केली आहे.

हेही वाचा : सिंदखेडराजा बाजार समितीत युतीचा जल्लोष, सभापतीपदी अनिल तुपकर तर विष्णू मेहेत्रे उपसभापती

महाराष्ट्रात निवडणुकीच्या तोंडावर प्रतिगामी शक्ती कार्यरत असून मोठया संख्येत विशेषत: महिलांना यामध्ये गुंतविण्यात आले आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना शिवपुराणाच्या नावाखाली धर्माचा आधार घेऊन गैरसमज पसरविणे चुकीची असून पुरोगामी लोकांनी या प्रकाराचा निषेध करायला हवा, असेही रुपराव वाघ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati ruprao wagh demand remove photo of sant gadge baba and tukdoji maharaj from the pavilion of shivmahapuran katha mma 73 css