अमरावती : नामांकित कंपन्‍यांच्‍या विम्‍याच्‍या नावाखाली एका सेवानिवृत्‍त बँक कर्मचाऱ्याची तब्बल ५१ लाख १० हजार ५४१ रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अनोळखी मोबाईल धारकांविरुध्द गुन्हा दाखल केला. ऑनलाईन फसवणुकीचे बरेच गुन्हे आपण ऐकलेत. ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार वेगवेगळ्या क्लृप्‍त्‍या वापरून नागरिकांची फसवणूक करतात. अशा अनेक गुन्ह्यांची पोलीस दप्तरी नोंद आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परंतु ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांची नामांकित विमा कंपन्‍यांच्या नावावर फसवणूक करण्यापर्यंत मजल गेली आहे. शहरातील रहिवासी सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने २०१४ ते २०१७ या वर्षात विमा कंपन्‍यांच्‍या वेगवेगळ्या ८ लाखांच्या पॉलिसी काढल्या होत्या. तसेच रिलायन्स आणि एक्साइड कंपनीमध्येसुध्दा पैसा गुंतविला होता. २०१७ पर्यंत ते काढलेल्या विम्‍याचे पैसे ते ऑनलाईन नियमित भरत होते. त्यानंतर २०२२ पासून त्यांना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून विम्‍याचे पैसे भरण्याकरिता फोन येत होते आणि संबंधित व्यक्तीने दिलेल्या बँक खात्यात ते पॉलिसीचे पैसे भरत होते.

सन २०२५ पर्यंत सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने तब्बल ५१ लाख १० हजार ४५१ रुपये भरले. दरम्यान त्यांच्या मुलांना शंका आल्याने त्यांनी पाहणी केली, तेव्‍हा २०२२ ते २०२५ पर्यंत विम्‍याचे हप्‍ते भरल्याच गेले नसल्याचे लक्षात आले. मुलांनी वडिलांचे बँक खाते बंद करून सायबर ठाण्यात घडलेला सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी अनोळखी २५ मोबाईल धारकांविरुध्द गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले.

सेवानिवृत्त बँक कर्मचाऱ्याने एक्साईड इंडस्ट्रीजमध्ये ८ लाख रुपये गुंतविले होते. परंतु काही वर्षानंतर एक्साईड इंडस्ट्रीज ही एचडीएफसीमध्ये ‘मर्ज’ झाली. तरीसुध्दा ते पैसे भरत गेले. तसेच त्यांना दर महिन्याला पैसे भरण्याकरिता फोन येत होते आणि त्यांनी दिलेल्या बँक खात्यात ते पैसे भरत गेले.

फसवणुकीची रक्कम वाढणार

संबंधित व्यक्ती २०१४ पासून नियमित विम्‍याचे पैसे भरत गेले. परंतु २०१७ ते २०२२ पर्यंत त्यांच्या खात्याचे बँक स्टेटमेंट मिळाले नाही. बँक स्टेटमेंट मिळताच फसवणुकीची रक्कम वाढणार आहे. त्यांनी काढलेल्या सर्व पॉलिसी योग्य आहेत. परंतु त्यांना पॉलिसीचे पैसे भरण्याकरिता आलेले फोन हे ऑनलाईन गुन्हेगारांचे आहेत हे स्पष्ट झाले आहे. सायबर लुटारूंनी आता वेगवेगळ्या क्लृप्‍त्‍या वापरून लोकांची फसवणूक सुरू केली आहे. त्याविषयी दक्षता बाळगण्‍याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.