अमरावती : मेळघाटातील धारणी व चिखलदरा हा या दोन्ही तालुक्यांत पाणीटंचाई तीव्र झाली आहे. आदिवासी वस्त्या तहानेने व्याकुळ झाल्या आहेत. रात्रीबेरात्री पाण्यासाठी आदिवासी बांधवांची भटकंती सुरू आहे. सध्या सात गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. मेळघाटातील बेला, मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहाद्दरपूर आणि गौलखेडा बाजार तसेच चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर या गावांध्ये अकरा टँकरच्या सहाय्याने पिण्याचे पाणी पुरविण्यात येत आहे. या गावांध्ये जलजीवन मिशनची कामे अपूर्णावस्थेत असल्याने तात्पुरती उपाययोजना म्हणून टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
मेळघाट हा डोंगरदऱ्यांचा भाग असून पावसाचे पाणी उतारावरून वाहून जाते. या पाण्याचा फायदा जिल्ह्यातील इतर भागांना होतो. पण मेळघाटातील छोटे पाडे, वस्त्या, ढाणा तहानलेलेच राहतात. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न डोके वर काढतो; आणि पाऊस आला की हा प्रश्न पुन्हा दुसऱ्याच वर्षी चर्चेला येतो. गेल्या दोन दशकांपासून हेच सुरू आहे. परंतु, कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप करण्यात आलेल्या नाहीत. जलसंधारणाच्या नावावर मेळघाटात मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली जातात; परंतु प्रत्यक्षात पाण्याचा साठा होताना दिसत नाही.
हेही वाचा : फडणवीस यांचा रामटेकमध्ये काय आहे प्लॅन ‘बी ‘ ?
मेळघाटात पशुधन मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. जेथे माणसालाच पिण्याचे पाणी मिळत नाही, तेथे पशूंची अवस्था आणखी बिकट आहे. गुरांना पाणी पाजण्यासाठी मेळघाटात आदिवासी बांधव आठ ते दहा किलोमीटर पायपीट करून जात असल्याची स्थिती आहे.
हेही वाचा : नागपूर: तीन महिन्यांत दोन लाखांवर हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई, पावणेपाच कोटी रुपयांचा दंड वसूल
रखरखीत उन्हामुळे जलस्त्रोत कोरडे पडत चालले आहेत. पाणीटंचाईची तीव्रता वाढल्याने तात्पुरत्या उपाययोजना म्हणून जिल्ह्यात सद्यस्थितीत खासगी ४५ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यंदा पावसाळ्यात चांदूर बाजार वगळता इतर १३ तालुक्यांमध्ये पावसाने सरासरी ओलांडली नाही. जलपुनर्भरण योग्यरीत्या न झाल्याने भूजल पातळी खालावली आहे.