अमरावती : एकीकडे पोहरा-मालखेड अभयारण्‍याचा प्रस्‍ताव अडगळीत पडलेला असताना छत्रीतलाव ते भानखेड मार्गावर हनुमान गढी येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या शिवमहापुराण कथेच्‍या आयोजनाच्‍या निमित्‍ताने जंगलात मानवी हस्‍तक्षेप वाढण्‍याची चिंता वन्‍यजीव अभ्‍यासकांनी व्‍यक्‍त केली आहे. या कार्यक्रमाआधी परिसरातील वृक्ष विनापरवानगी कापून त्‍याची विल्‍हेवाट लावण्‍यात आल्‍याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्‍या नेतृत्‍वात हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्‍टच्‍या वतीने कथा प्रवक्‍ते पंडित प्रदीप मिश्रा यांच्‍या शिवमहापुराण कथेचे आयोजन येत्‍या १५ ते २० डिसेंबर दरम्‍यान करण्‍यात आले आहे. छत्रीतलाव ते भानखेड मार्गावर सुमारे ५० एकर क्षेत्रात मोठा मंडप उभारण्‍यात येत आहे. याच ठिकाणी बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांच्‍या निवासाची आणि भोजनाची देखील व्‍यवस्‍था राहणार आहे.

हेही वाचा : दारूबंदी जिल्ह्यात दारू निर्मितीचा कारखाना; पद्मश्री डॉ. अभय बंग यांचा विरोध, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

या कार्यक्रमाच्‍या आयोजनाआधी झालेल्‍या वृक्षतोडीची तक्रार ‘वाईल्‍डलाईफ अवेअरनेस रिसर्च अॅन्‍ड रेस्‍क्‍यू वेलफेअर सोसायटी (वॉर) या संस्‍थेने विभागीय आयुक्‍तांकडे केली. छत्री तलाव, भानखेड रोड, माळेगाव परिसरात मोठ्या प्रमाणात औषधी वनस्‍पती आणि वृक्ष आहेत. या परिसरातील जंगल हे वन्‍यजीवांचा अधिवास आहे. काही लोकांनी या परिसरातील वृक्ष कापून त्‍यांची वाहतूक करून विल्‍हेवाट लावली. त्‍यामुळे वन्‍यप्राणी शहराकडे धाव घेत असून अचानक मानवी वर्दळ आणि हस्‍तक्षेप वाढल्‍याने मानव-वन्‍यजीव संघर्ष वाढण्‍याचा धोका असल्‍याचे या संस्‍थेने निवेदनात म्‍हटले आहे. महाराष्‍ट्र वृक्षतोड अधिनियम, भारतीय वन अधिनियम, महाराष्‍ट्र वृक्ष संवर्धन अधिनियमातील कलमांन्‍वये बेकायदेशीर वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ‘वॉर’ संस्‍थेने विभागीय आयुक्‍तांकडे केली. अशीच मागणी भीम ब्रिगेड या संघटनेने जिल्‍हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

हेही वाचा : अश्रूंचा महापूर, गावगाडा ठप्प; “अशी अंत्ययात्रा गावात होणे नाही!”

या कार्यक्रमाच्‍या निमित्‍ताने प्रशासकीय गतिमानता हा देखील चर्चेचा विषय ठरला आहे. बडनेरा-तपोवनेश्‍वर-पोहरा-बोडना-पिंपळखुटा या रस्‍त्‍याच्‍या दुरूस्‍ती आणि मजबुतीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला. हा रस्‍ता वनक्षेत्रातून जातो. या कामाला वनविभागाने अटींच्‍या अधीन राहून १ डिसेंबर रोजी परवानगी देखील दिली.
या कार्यक्रमासाठी एका खासगी विहिरीतून तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात पाणी पुरवठ्याची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. महाराष्‍ट्र जीवन प्राधिकरणाने देखील या ठिकाणी पाणी पोहचविण्‍याच्‍या हालचाली सुरू केल्‍याची माहिती आहे.

हेही वाचा : जरांगेंची टीका अन् फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…..

७० ते ८० हजार लोकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येत असून मुक्कामी असणाऱ्या भाविकांसाठी जेवण, नाष्टा, आदी सुविधा निःशुल्क देण्यात येणार आहे. भाविकांची गैरसोय होणार नाही, असे नियोजन करण्यात येत असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. वृक्षतोडीसंदर्भात प्रतिक्रिया जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता, त्‍यांच्‍याशी संपर्क होऊ शकला नाही.

“शिवमहापुराण कथा आयोजनाच्‍या पार्श्‍वभूमीवर वनक्षेत्रात वृक्षतोडीच्‍या घटना निदर्शनास आलेल्‍या नाहीत. खाजगी जमिनीवरील झुडूपे काढण्‍यात आली आहेत. वृक्षतोड होऊ नये, याची दक्षत घेण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. बडनेरा ते पिंपळखुटा या रस्‍त्‍याच्‍या दुरूस्‍तीच्‍या कामाला अटी व शर्तींच्‍या अधीन राहून परवानगी देण्‍यात आली आहे.” – अमित मिश्रा, उपवनसंरक्षक, अमरावती.

हेही वाचा : सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ, देशात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक

“शिवमहापुराण कथेच्‍या आयोजनाला विरोध असण्‍याचे कारण नाही, पण या निमित्‍ताने जंगलात मानवी हस्‍तक्षेप वाढू नये, याची काळजी घेतली पाहिजे. कार्यक्रमाआधी काही लोकांनी वृक्षतोड केली, त्‍यांच्‍यावर कारवाई अपेक्षित आहे.” – नीलेश कांचनपुरे, अध्‍यक्ष, ‘वॉर’ संस्‍था.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati threat to environment due shivmahapuran katha planned at hanumangadhi humam wildlife conflict mma 73 css