अमरावती : महाविकास आघाडी सरकारचे काम सुरळीत सुरू असताना गद्दारी करून हे चांगले सरकार पाडण्‍यात आले. महायुतीने अडीच वर्षे काहीच केले नाही. जनाधार कमी होत चालल्‍याचे पाहून निवडणुकीच्‍या तोंडावर यांचे बहिणींसाठी प्रेम उफाळून आले आहे. राज्‍यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ हे तीन भाऊ आहेत. त्‍यांच्‍यात भाऊबंदकी आहे. पण, तरीही ते एकत्र फिरताहेत. आपण तिघे भाऊ, मिळून महाराष्‍ट्र खाऊ, असेच त्‍यांचे वर्तन आहे, अशी टीका माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दर्यापूर येथे बोलताना केली.

दर्यापूर येथे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार गजानन लवटे यांच्‍या प्रचारार्थ गुरूवारी दुपारी आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, आमदार यशोमती ठाकूर आदी उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्‍हणाले, देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊंनी महिलांसाठी योजना जाहीर केली, पण महिलांच्‍या सुरक्षेचे काय.

हेही वाचा : “हफ्ते घेणारे नव्हे; हफ्ते देणारे आमचे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

बदलापूरमध्‍ये एका चिमुकल्‍या मुलीवर शाळेत अत्‍याचार होतात. तिच्‍या आईची तक्रारही नोंदवून घेतली जात नसेल, तर पंधराशे रुपयांची मदत चाटायची का, असा सवाल त्‍यांनी केला. या तीन भावांनी पीडित मुलीच्‍या आईची भेट घेऊन त्‍यांना पंधराशे रुपयांची मदत देऊन पहावी. पायताणाने तोंड फुटल्‍याशिवाय राहणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केले.

महाराष्‍ट्रात बेरोजगारी वाढली आहे. सुशिक्षित तरूणांच्‍या हाताला काम नाही. केंद्र सरकारला मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करायची आहे. आजवर महाराष्‍ट्रातील अनेक मोठे प्रकल्‍प गुजरातला पळविण्‍यात आले, आता येथील तरूणांना गुजरातमध्‍ये त्‍यांना न्‍यायचे आहे का, असा सवाल करीत माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटायला हवी, नागपुरातील टाटा-एअरबस प्रकल्‍प पळवून गुजरातला गेला, निदान तो तरी फडणवीसांनी वाचवायला हवा होता, असा टोला त्‍यांनी लगावला.

हेही वाचा : दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

उद्धव ठाकरे म्‍हणाले, खाद्यतेल आयात केल्‍यामुळे सोयाबीनचे भाव पडले. हमीभावापेक्षा कितीतरी कमी किमतीत कापूस विकावा लागत आहे. सत्‍ताधारी लोक ज्‍या कापसाच्‍या गादीवर बसून आहेत, आता त्‍यातील कापूस काढून घेण्‍याची वेळ आली आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्‍वाचे विचार सोडले, अशी टीका विरोधक माझ्यावर करताहेत.

पण, मला भाजपच्‍या लोकांनी हिंदुत्‍व शिकविण्‍याची गरज नाही. हृदयामध्‍ये राम आणि लोकांच्‍या हाताला काम हे आमचे हिंदुत्‍व आहे. आमचे हिंदुत्‍व चूल पेटविणारे आहे. दुसऱ्यांची घरे पेटविणारे हिंदुत्‍व मला मान्‍य नाही. हे लोक आता जाती-जातीत भेद निर्माण करू पाहताहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.