अमरावती : माजी मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे यांच्‍या प्रचार सभांचा धडाका सुरू झाला आहे. पक्षाच्‍या उमेदवारांच्‍या प्रचारार्थ ते ठिकठिकाणी सभा घेत आहेत. उद्धव ठाकरे यांचे ज्‍येष्‍ठ सुपूत्र आदित्‍य ठाकरे हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. पण, यावेळी त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव तेजस ठाकरे यांचेही नाव चर्चेत आले आहे. उद्धव ठाकरेंनी गुरूवारी सायंकाळी वलगाव येथे तिवसा मतदारसंघातील काँग्रेसच्‍या उमेदवार यशोमती ठाकूर यांच्‍या प्रचारार्थ आयोजित सभेला संबोधित केले. मंचासमोरील एका खुर्चीवर बसलेले पांढरा शर्ट घातलेले तेजस ठाकरे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. मंचावर नेत्‍यांच्‍या रांगेत बसण्‍याऐवजी तेजस ठाकरे यांनी सामान्‍यांप्रमाणे श्रोत्‍यांच्‍या खुर्चीवर बसणे पसंत केले.

यशोमती ठाकूर यांनी आपल्‍या भाषणात या घटनेचा उल्‍लेख केला. त्‍या म्‍हणाल्‍या, माजी मुख्‍यमंत्र्यांचा मुलगा सर्वसामान्‍यांप्रमाणे खुर्चीवर बसून शांतपणे आमची भाषणे ऐकत आहेत. ते तर सहजपणे मंचावर वावर करू शकले असते. पण, हे ठाकरे कुटुंबीयांचे संस्‍कार आहेत. जनतेसोबत ते जुळलेले आहेत, अशा शब्‍दात त्‍यांनी तेजस ठाकरे यांचे कौतुक केले. त्‍यांच्‍या या वक्‍तव्‍यानंतर सर्वांच्‍या नजरा तेजस ठाकरे यांच्‍याकडे वळल्‍या. तेजस ठाकरे हे वलगावच्‍या सभेपुर्वी दर्यापूर येथे आयोजित सभेलाही पूर्णवेळ उपस्थित होते. बेलोरा विमानतळावर त्‍यांचे उद्धव ठाकरे यांच्‍यासमवेत आगमन झाले, तेव्‍हा तेजस ठाकरे यांच्‍यासोबत छायाचित्र काढण्‍यासाठी अनेक जण सरसावले.

हेही वाचा : “राज्‍यात तीन भाऊ, मिळून महाराष्‍ट्र खाऊ…”, उद्धव ठाकरे यांची महायुतीवर टीका

तेजस ठाकरे हे वन्यजीव संवर्धनासाठी काम करतात. त्यांचे वन्यजीव प्रेम अनेकदा अधोरेखित झाले आहे. २०१४ मध्‍ये त्यांनी एका पालीच्‍या प्रजातीचा शोध घेतला होता. ही पाल वेगळ्या प्रजातीची आहे का, यावर संशोधन झाले आणि अखेर प्राणी शरीर शास्त्राच्या नियमानुसार तिला ‘मॅगनिफिसंट डवार्फ गेको’ असे नाव देण्यात आले. तेजस आणि त्यांच्या चमूने या पालीवर तयार केलेला शोधनिबंध ‘झुटाक्सा’ या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या जर्नलमध्येही प्रसिद्ध झाला आहे.

हेही वाचा : “हफ्ते घेणारे नव्हे; हफ्ते देणारे आमचे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

दोन वर्षांपूर्वी त्यांनी पश्चिम घाटातच सापाची एक नवी प्रजाती शोधून काढली होती आणि ठाकरे यांच्याच नावावरून त्याला ‘बोईगा ठाकरेयी’ असे नाव देण्यात आले होते. गोड्या पाण्यातल्या खेकड्याचीही दुर्मिळ जात त्यांनी आणि त्यांच्या टीमने शोधून काढली होती. तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्‍या सभांना उपस्थित राहून नियोजन करीत असल्‍याने नजीकच्‍या काळात ते राजकारणात सक्रीय होणार का, याची चर्चा रंगली आहे.