अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आटल्याने वन्य प्राण्यांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यातच कृत्रिम पाणवठेही कोरडे पडल्याने पाण्याअभावी वन्य प्राण्यांची पाण्यासाठी पळापळ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील दहा बारा वर्षांपासून मेळघाटातील बारमाही वाहणाऱ्या नदी, नाले आपले अस्तित्व गमावून बसले आहे. नैसर्गिक पाणवठे आटत चालले आहेत.

वनविभागाने जंगलातील अनेक ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार केल्याने वन्यप्राण्यांची तृष्णातृप्ती होत आहे. वनविभागाकडून आता कृत्रिम पाणवठ्यांवर टँकर तसेच सोलर पंपांद्वारे नियमित पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

नैसर्गिक अधिवासाला पहली पंसती देणारे वन्यप्राणी जलस्रोत आटल्यामुळे अधिवास सोडून स्थलांतरित करण्याची शक्यता असते. सध्‍या कृत्रिम पाणवठ्यावर आपली तहान भागविण्यासाठी वन्यप्राणी हे जंगलात भटकत असल्याचे चित्र दिसत आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी अनेक नैसर्गिक पाणवठे आहेत. पण यंदा वाढत्या उन्हामुळे हे नैसर्गिक स्रोत आटले आहेत.

मेळघाटातील सिपना, गडगा, मेलडोह, खंडू, खापरा, राजादही, डवाल, कुकरी अशा जंगलातून निघालेल्या नद्यांचा प्रवाह एप्रिल सुरू होण्‍याच्‍या आधीच आटला. त्यामुळे वनअधिकारी वन्यप्राण्यांच्या मदतीला धावून आले आहेत. रखरखत्या उन्हाळ्यात व्याघ्र प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी, वनपाल, पाणवठ्यात टँकरने पाणी पुरवठा करताना दिसत आहेत. हतरू, रायपूर, जारीदा, सेमाडोह, हरिसाल, चौराकुंड, तारूबांदा, हरिसाल, सेमाडोह येथील वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या ताफ्यासह या पाणवठ्यावर लक्ष केंद्रित करून वन्यप्राण्यांच्या पाण्याची व्यवस्था करीत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या समोरील पाणी टंचाईची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली आहे.

मेळघाटात भरपूर पाऊस होत असला तरी सर्व पाणी डोंगरावरून खाली वाहून जात असल्याने या भागात पाण्याची मोठी टंचाई असते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात वाघ, बिबट, अस्वल, रानगवे, सांबार, हरिण, नीलगाय या वन्यप्राण्यांसह विविध पक्ष्यांच्या तृष्णातृप्तीसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

जंगलात ज्या भागात उन्हाळ्यातही पाणी असणारी विहीर आहे, यासह ज्या भागात बोअर आहे, अशा ठिकाणावरून सौर ऊर्जेचा वापर करून सिमेंट बशी आणि कृत्रिम पाणवठ्यात पाणी आणले जाते. जंगलात अनेक भागात सौरपंपांची व्यवस्था आहे. ज्या अडचणीच्या ठिकाणी सौर ऊर्जेची व्यवस्था नाही, अशा भागात असणाऱ्या सिमेंट बशी आणि कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवले जाते.