अमरावती : तिवसा तालुक्यातील माळेगाव येथे राहणाऱ्या एका ३५ वर्षीय तरुणाने दोन दिवसांपूर्वी घरी जाळून घेतले. त्याच्यावर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान त्याच्या शुश्रूषेसाठी सोबत असलेल्या २८ वर्षीय पत्नीने रुग्णालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरती सुरेश सावंत (२८, रा. माळेगाव, तिवसा) असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तसेच सुरेश सावंत (३५, रा. माळेगाव) असे जळाल्यामुळे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा : गोंदिया : झाडीपट्टीच्या नाट्याचा उठणार पडदा! स्थानिक कलाकारांकडून संस्कृतीची जोपासना, मंडई उत्सवाची धूम
हेही वाचा : यंदा छोट्या विक्रेत्यांचीही दिवाळी जोरात, काय आहेत कारणे?
या तरुणाने दोन दिवसांपूर्वी घरीच जाळून घेतले होते. यात सुरेश सावंत ९० टक्के जळाले आहे. मी वैयक्तिक कारणामुळे जाळून घेतल्याचे सुरेशने पोलिसांना जबाबात सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरेशवर उपचार सुरू आहेत. त्याच्याजवळ रुग्णालयात त्याची आई व पत्नी आरती होती. रात्री आई व पत्नी आरती वॉर्डमध्ये झोपली होती. मात्र पहाटे चार ते साडेचार वाजताच्या दरम्यान आरतीने वॉर्डपासून काही अंतरावर असलेल्या एका जिन्याजवळ गळफास लावून घेतला आणि आत्महत्या केली. ही बाब रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना लक्षात येताच त्यांनी गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. या महिलेच्या आत्महत्येचे कारण लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.