अमरावती : शेत जमिनीचे बनावट दस्तावेज तयार करून येथील एका महिलेची तब्बल १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी चार महिलांसह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चुन्नीलाल मंत्री, ओमप्रकाश मंत्री, जयप्रकाश मंत्री, अशोकुमार मंत्री, किशोर मंत्री आणि कुटुंबातील चार महिलांच्या विरोधात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा : आंदोलकांवरील लाठीहल्ला शासनाचा नाकर्तेपणा; प्रदेश काँग्रेस सचिव जयश्री शेळकेंनी घेतली जरांगे पाटील यांची भेट
हेही वाचा : दारूची नशा; सातबाऱ्यावर स्वाक्षरी करताना मद्यधुंद तलाठी कोसळला, व्हायरल व्हिडीओने खळबळ
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार तिचे नातेवाईक सैन्यात होते. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात त्यांना गोळी लागून ते जखमी झाले होते. १९७२ मध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर तक्रारकर्त्या महिलेला शासनाकडून १.५४ हेक्टर जमीन शहरानजीक नवसारी येथे देण्यात आली होती. मात्र, या जमिनीची अदलाबदली लेख करून चुन्नीलाल मंत्री यांनी तक्रारदार महिलेला मौजे रसुलाबाद येथे १ हेक्टर २१ आर जमीन देण्याचे नमूद केले. २० डिसेंबर १९९३ रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात नवसारी येथील जमीन मंत्री यांनी स्वत:च्या नावे करून घेतली. या जमिनीची सरकारी किंमत १ कोटी ८० लाख रुपये आहे. बनावट दस्तऐवजाच्या माध्यमातून आपली फसवणूक केल्याचा महिलेचा आरोप आहे. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहेत.