अमरावती : पतीने उसने दिलेले पैसे परत मागायला गेलेल्या एका महिलेवर अतिप्रसंग करण्यात आला. त्यांचे अश्लील छायाचित्रे व चित्रफीत काढण्यात आली. ते पतीला दाखविण्याची धमकी देत अपहरण करून पुन्हा अत्याचार करण्यात आला. ही घटना चांदूरबाजार ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
रितेश भास्कर वानखडे (३२) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित ३० वर्षीय महिलेच्या पतीने रितेशला उसने म्हणून ५०० रुपये दिले होते. ते पैसे परत मागायला पीडित महिला ४ फेब्रुवारी रोजी दुपारी रितेशच्या घरी गेली. त्यावेळी रितेशने जबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्याचवेळी महिलेचे अश्लील छायाचित्रे व व्हिडीओही काढला. ते पतीला दाखवितो, अशी धमकी देऊन त्याने महिलेला पुन्हा आपल्या घरी बोलावून लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने सदर छायाचित्रांच्या आधारावर महिलेचे अपहरण करून पुणे येथे नेले. दरम्यान, पीडित महिला पुण्यावरून आपल्या गावी परतली. त्यानंतर पतीसोबत चांदूरबाजार ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून आरोपी रितेशविरुद्ध बलात्कार, अपहरण व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सूरज बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
हेही वाचा: यवतमाळ: धक्कादायक! गाढ झोपेत असलेल्या बाप-लेकास विषारी सापाचा दंश
दुकाने फोडणारे दोन अट्टल चोरटे जेरबंद
दुकाने फोडणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल ९ गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यात दर्यापूर ठाण्याच्या हद्दीतील ३ गुन्ह्यांचा समावेश आहे. गजानन सोपानराव शिंगाडे (३५) रा. पाचन वडगाव, जालना व राहुल तुलजासिंग राजपूत (२२) रा. मंगलबाजार, लोधी मोहल्ला, जालना अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. २० जुलै रोजी रात्री दर्यापूर ठाण्याच्या हद्दीतील देशी दारूचे दुकान फोडून ६४ हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला होता. त्याचप्रमाणे एका जिनिंगमधून ७८ हजारांचा आणि सराफा दुकानातून १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबविण्यात आला होता. पोलीस तपासात या गुन्ह्यात जालना येथील गजानन शिंगाडे याचा सहभाग असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने जालना गाठून गजाननला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दर्यापुरातील तिन्ही गुन्ह्यांची कबुली दिली. राहुल राजपूत व अन्य ३ साथीदारांसह यवतमाळ जिल्ह्यात करंजी येथून चारचाकी वाहन चोरी करून मारेगाव येथील दोन दुकानात चोरी केली. त्यानंतर अमरावती जिल्ह्यात दाखल होऊन अन्य एक चारचाकी वाहन चोरल्यावर दर्यापूर येथील देशी दारूसह सराफा दुकान व जिनिंगमध्ये चोरी केल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार गजाननचा साथीदार राहुल राजपूत याला अटक करण्यात आली.
© The Indian Express (P) Ltd