अमरावती : शहरात एमडी (मेफेड्रॉन) आणि इतर अमली पदार्थांच्या तस्करीत वाढ होत आहे. कारमधून ‘एमडी’ची तस्करी करणाऱ्या तिघांना पोलीस आयुक्तांच्या विशेष पथकाने बडनेरा-अकोला मार्गावरून अटक केली. त्यांच्याकडून ४०.३४ ग्रॅम ‘एमडी’सह कार, ३ मोबाइल व वजन काटा असा ८ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अब्दुल एजाज अब्दुल अजीम (४७) रा. हबीबनगर, अमरावती, शाहरुख खान बिसमिल्ला खान (३०) रा. खुर्शीदपुरा, अमरावती व अविनाश मनोज खांडेकर (२८) रा. जुनी वस्ती, बडनेरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुंबईवरून एका कारमधून अमरावतीला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात ‘एमडी’ आणण्यात येत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या विशेष पथकाला मिळाली.
या माहितीच्या आधारावर विशेष पथकाने बडनेरा-अकोला मार्गावर सापळा रचून संशयास्पद कार क्रमांक एमएच २७ बीझेड २०११ अडविली. त्यावेळी कारमध्ये अब्दुल एजाज, शाहरुख खान व अविनाश हे तिघे बसून होते. विशेष पथकाने कारची झडती घेतल्यावर त्यात ४०.३४ ग्रॅम ‘एमडी’ हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानुसार पथकाने तिघांनाही अटक करून त्यांच्याकडून ‘एमडी’, कार, ३ मोबाइल व वजन काटा असा एकूण ८ लाख ३२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध बडनेरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले, साहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश इंगळे, पोलीस उपनिरीक्षक तुषार गावंडे, युसूफ सौदागर, छोटेलाल यादव, रणजित गावंडे, निखिल माहुरे, आशिष डवले, निवृत्ती काकड, संजय भारसाकडे, अमोल मनोहर, नईम बेग, गजानन सातंगे यांनी केली. दारू, सिगारेटपासून मुलांना दूर ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करणाऱ्या पालकांपुढे आता अमली पदार्थांच्या विळख्यापासून दूर ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. हा विळखा शाळा-महाविद्यालयांपासून सार्वजनिक ठिकाणापर्यंत जोरकसपणे बसत आहे. या व्यसनांचे केवळ शारिरिक नाही तर मानसिक पातळीवर होणारे परिणामही दीर्घकालीन, गंभीर आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते अंमली पदार्थ हे एक रसायन आहे. शरीराच्या क्रिया मंदावण्यापासून त्या उत्तेजित करण्यापर्यंत अनेक बदल या उत्तेजक द्रव्यामुळे होतात. मज्जासंस्था आणि इतर अवयवांवर या अंमली पदार्थांचा परिणाम होतो. उत्तेजक अंमली पदार्थ, उदासीनता आणणारे पदार्थ, गुंगी आणणारे वेदनाशामक पदार्थ, कॅनबीज, दृष्टी, श्रवणशक्ती, विचारप्रक्रियेत संभ्रम आणणारे पदार्थ हे सगळे शरीरावर विपरीत परिणाम करतात.