अमरावती : समाज माध्यमावर ओळख झालेल्या एका तरुणीसह तिच्या दोन मैत्रिणींशी असभ्य वर्तन करणाऱ्या एका तरुणाला नागरिकांनी बदडून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना नांदगाव पेठ ठाण्याच्या हद्दीतील कठोरा परिसरात घडली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सय्यद जमीर सय्यद शकील (२५) रा. करजगाव, अमरावती असे आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी व सय्यद जमीर यांची समाज माध्यमावर ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला.

दरम्यान, सय्यद जमीरने पीडित तरुणीला मोबाइलवर संपर्क साधून भेटायला बोलाविले. त्यानुसार पीडित तरुणी ही आपल्या दोन मैत्रिणींसह त्याला भेटायला गेली. त्यानंतर त्या तिघी सय्यद जमीरच्या दुचाकीवर बसून कठोरा येथे गेल्या. तेथे सय्यद जमीरने पीडित तरुणीला शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, तरुणीने त्याला नकार दिला. त्यावर त्याने तिच्यासोबत असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे तरुणीने आरडाओरड केली. आवाज ऐकून तिच्या दोन मैत्रिणी मदतीसाठी धावून आल्या. त्यावर सय्यद जमीरने त्यांच्याशीही असभ्य वर्तन करून त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तेथे धाव घेतली.

नागरिकांनी सय्यद जमीरला बदडून नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यानंतर सय्यद जमीरला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी सय्यद जमीरविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. आजकाल व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स अशा विविध समाज माध्यमांवर अनेक मित्रमैत्रीणी असणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यात प्रत्यक्षात भेटणारे, ओळखणारे लोक कमी असतात. आभासी जगतातील हे मैत्रीचे जाळे गुन्हेगारांना आयती संधी देत आहे.

ही घ्या काळजी…

  • अनेक वर्षे माहिती असलेल्या व्यक्ती आणि नवी ओळख झालेल्या व्यक्ती यांच्यात फरक करणे गरजेचे आहे. ओळख वाजवीपेक्षा अधिक वाढवली जात आहे, असे लक्षात येताच योग्य ती सावध धोरणे आखावीत.
  • समाजमाध्यमांवरील सर्व खात्यांसाठी योग्य सुरक्षा सेटिंग करून घ्यावे. उदा. फेसबुकवर आपले प्रोफाइल लॉक करावे म्हणजे माहिती सुरक्षित राहते.
  • आपण एकटे राहत असाल, तर बाहेर भेटणारे आणि समाजमाध्यमावर भेटणारे सर्व लोक फसवेगिरी करणारे असतील, असे समजून काळजीपूर्वक वागणे गरजेचे.