अमरावती : माहुली जहागीर ठाण्याच्या हद्दीतील चिचखेड येथील प्रवासी निवाऱ्यात मृतावस्थेत आढळून आलेल्या तरुणाची हत्या करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणाचा उलगडा करीत मारेकऱ्यास अटक केली. गाडीला कट मारल्याच्या वादातून आपण हत्या केल्याची कबुली त्याने दिली.
आकाश उर्फ बंडू तायडे (२२) रा. डवरगाव असे मृताचे नाव आहे. तर प्रणित भाष्करराव जवंजाळ (३२) रा. बेलोरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या आकाश हा माहुली जहागीर ते मोर्शी मार्गावरील चिचखेड येथील प्रवासी निवाऱ्यामध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. मृताची ओळख पटविण्याकरिता पोलिसांनी आजूबाजूच्या गावातील नागरिकांना मृतदेहाचे छायाचित्र दाखविले. त्यावेळी तो मृतदेह आकाश उर्फ बंडू तायडे याचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर मृत आकाशच्या आईला विचारपूस करण्यात आली. ३१ जानेवारी रोजी सकाळी आकाश हा मित्रांसोबत कामानिमित्त दुचाकीने बाहेर गेला होता. त्याच दिवशी त्याला त्याच्या भावाने डवरगाव चौकात पाहिले होते. मात्र, तो रात्री घरी परतला नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. १ फेब्रुवारी रोजी त्याचा मृतदेहच आढळून आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी अज्ञात व्यक्तीने आपल्या मुलाचा खून केल्याची तक्रार माहुली जहागीर पोलिसांत दाखल केली. या गुन्ह्याच्या उलगड्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथके तयार करण्यात आली.
हेही वाचा…अमरावती : अश्लील छायाचित्रे प्रसारीत करण्याची धमकी देत मागितली खंडणी
तपासात २७ जानेवारी रोजी आकाश व प्रणित यांच्यात डवरगाव फाट्यावर दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यावेळी आकाशने प्रणितला शिवीगाळ व मारहाण केली होती, अशी माहिती समोर आली. त्यानुसार प्रणितला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने २७ जानेवारी रोजी झालेल्या वादाचा सूड घेण्यासाठी ३१ जानेवारी रोजी आकाशला दारू पिण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसवून चिचखेड फाट्याजवळ आणले. तेथे आकाशला दारू पाजली. त्यानंतर कमरेच्या बेल्टने व बांबूच्या काठीने त्याला मारहाण केली. आकाशला तेथेच सोडून आपण गावी परतलो. मारहाणीत आकाशचा मृत्यू झाला, असे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे, माहुली जहागीरचे ठाणेदार विष्णू पांडे, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, बळवंत दाभणे, सचिन मिश्रा, रवींद्र बावणे, पंकज फाटे, भूषण पेठे, हर्षद घुसे यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परिश्रम घेतले.