अमरावती : एका तरुणीच्या नियोजित वराला बनावट आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवून तिची बदनामी करण्यात आली. ही घटना राजापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून अभियंता तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. श्रीतेज राजेंद्र नागपुरे (२९, रा. रुक्मिणीनगर, अमरावती) गुन्हा दाखल झालेल्या अभियंता तरुणाचे नाव आहे. पीडित तरुणी व श्रीतेज यांची मैत्री होती. प्रशिक्षणासाठी सोबत असताना श्रीतेज आणि पीडित तरूणीमध्ये प्रेमसंबंध झाले. २०१४ पासून ती पुढील शिक्षणाकरिता पुणे येथे गेली.
त्यामुळे श्रीतेजनेही पुण्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथे पीडित तरूणी व श्रीतेज हे दोघे एकमेकांना भेटत होते. दरम्यान, काही दिवसांनी तो तरुणीवर जास्त लक्ष ठेवायला लागला. त्याला कंटाळून २०१८ मध्ये या तरुणीने त्याच्यासोबत संबंध तोडून टाकले. तत्पूर्वी, त्यांचे प्रेमसंबंध सुरू असताना तरुणीची काही छायाचित्रे श्रीतेजच्या मोबाइलमध्ये होते. २०१९ मध्ये तरुणी ही नोकरी करत असताना श्रीतेज तिला वारंवार मोबाईलवर संपर्क साधून त्रास देत होता. तरुणीच्या बहिणीला सुद्धा त्याने तुम्ही संबंध तोडण्यास संमती कशी दिली, अशी विचारणा करून त्रास दिला. श्रीतेज हा कंपनीतील इतर सहकाऱ्यांना छायाचित्रे ठेवून तिची बदनामी करत होता.
हेही वाचा : गडचिरोलीच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच!
त्यामुळे तरुणीच्या तक्रारीवरून मुंबई येथे गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यानच्या काळात तिचे लग्न जुळले. याबाबत कळल्यावर श्रीतेजने २१ डिसेंबरला तरुणीच्या होणाऱ्या पतीला तिचे काही आक्षेपार्ह छायाचित्रे पाठवले. ही बाब तिच्या होणाऱ्या पतीने मोबाइलवर संपर्क साधून तिला सांगितली. ती छायाचित्रे पाहताना तिच्या होणाऱ्या पतीने व्हिडीओ रेकॉर्ड केला. तो पाहताच तिला धक्का बसला. ते सर्व छायाचित्रे बनावट असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. श्रीतेज हा आयटी कंपनीत इंजिनिअर असून तांत्रिक बाबींचे ज्ञान त्याला आहे, असे पीडित तरूणीने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्ट निर्देश, तरी पी.ए. होण्यासाठी उड्यावर उड्या…
श्रीतेज आणि तरूणीमध्ये प्रेमसंबंध होते. श्रीतेजने बनावट छायाचित्रांचा वापर करून तरूणीला त्रास देण्याच्या उद्देशाने ही आक्षेपार्ह छायाचित्रे तरूणीच्या होणाऱ्या पतीला पाठवली. त्यामुळे तरूणीची बदनामी झाली. याआधीही आरोपीने असे प्रकार वारंवार केले. या सर्व गोष्टींचा प्रचंड मनस्ताप तरूणीला झाला. प्रेमसंबंध तोडण्याच्या रागातून आरोपी हा प्रचंड त्रास देत असल्याचे पीडित तरूणीने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.