अमरावती : बडनेरा रेल्‍वेस्‍थानक परिसरात घडलेल्‍या एका महिलेच्‍या हत्‍येप्रकरणी पोलीस तपासात धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. या महिलेला नुकतीच ओळख झालेल्‍या व्‍यक्‍तीसोबत ‘नको त्या’ अवस्‍थेत बघितल्‍याने पतीने संतापाच्‍या भरात तिच्‍या डोक्‍यावर विटेने प्रहार करून हत्‍या केली. पोलिसांनी आरोपीला मध्‍यप्रदेशातील त्‍याच्‍या गावावरून अटक केली आहे. त्‍याने हत्‍येची कबुली दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लक्ष्‍मण मानसिंग मरावी, (३५, रा. ओहनी, जिल्‍हा मंडला, मध्‍यप्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणात आधी शेखर ऊर्फ चंद्रशेखर चिंचोळकर (३४, रा. इंदिरानगर, बडनेरा) या संशयित आरोपीला अटक केली होती. बडनेरा रेल्वे स्थानकावरील जुन्या वस्तीच्या बाजूने पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृत महिलेच्या शवविच्छेदन अहवालात डोक्यावरील जखमांमुळे मृत्यू झाल्याचे नमूद असल्याने या महिलेची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.

हे ही वाचा…खंडणीसाठी मित्राने पातळी सोडली, झाले असे की …

पोलिसांना या हत्‍येच्‍या प्रकरणाचा छडा लावण्‍यात अखेर यश आले. आरोपी लक्ष्‍मण मरावी हा पत्‍नी भगवती हिच्‍यासोबत कामाच्‍या शोधात बडनेरा रेल्‍वे स्‍थानकावर आला होता. बडनेरा परिसरात पती-पत्‍नीने रोजगार मिळवण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू केले होते. त्‍यावेळी त्‍यांची शेखर चिंचोळकर याच्‍यासोबत ओळख झाली. तुम्‍हा दोघांनाही काम मिळवून देतो, असे आश्‍वासन त्‍याने मरावी दाम्‍पत्‍याला दिले. रात्र झाल्‍यानंतर शेखरने दोघांनाही स्‍वत:च्‍या घरी थांबण्‍याचा आग्रह धरला. पण, लक्ष्‍मण मरावीने नकार दिला आणि तो पत्‍नीसह बडनेरा रेल्‍वेस्‍थानकाच्‍या वाहनतळानजीक पोहचला. त्‍या ठिकाणी शेखर देखील आला. लक्ष्‍मणच्‍या पत्‍नीने शेखरला दारू आणण्‍यासाठी पैसे दिले. लक्ष्‍मणने या दरम्‍यान गावी जाण्‍यासाठी दोघांचे गोंदियापर्यंतचे तिकीटही काढून ठेवले. शेखरने दारू आणल्‍यानंतर तिघांनीही वाहनतळानजीक पाण्‍याच्‍या टाकीखाली मद्यप्राशन केले. तिघेही त्‍याच ठिकाणी झोपले. रात्री उशिरा आरोपी लक्ष्‍मणला जाग आली, तेव्‍हा त्‍याला पत्‍नी आणि शेखर आक्षेपार्ह स्थितीत दिसले. त्‍यानंतर पती-पत्‍नीत कडाक्‍याचे भांडण झाले. त्‍यातच लक्ष्‍मणने पत्‍नीला मारहाण केली, तिला ओट्यावर आपटले, विटेने तिच्‍यावर वार केले. या दरम्‍यान, शेखर तेथून पळून गेला. पत्‍नीला जखमी अवस्‍थेत सोडून लक्ष्‍मण हा परिसरातच झोपला. पहाटे उठल्‍यानंतर त्‍याला पत्‍नी मृतावस्‍थेत दिसली. त्‍याने तिच्‍या शरीरावर ब्‍लँकेट टाकले आणि तो रेल्‍वे स्‍थानकावर पोहचला. रेल्‍वेने गोंदियापर्यंत आणि नंतर आपल्‍या गावी परतला. पोलिसांनी लक्ष्‍मणला त्‍याच्‍या गावातून अटक केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In angery husband hit woman on head with brick in badnera railway station mma 73 sud 02