गडचिरोली : संपत्तीसाठी सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाची सहायक संचालक अर्चना पुट्टेवार (पार्लेवार) आणि तिचा भाऊ सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योग विभागाचा संचालक प्रशांत पार्लेवार या दोघांकडे असलेल्या कोट्यवधीच्या मालमत्तेसंदर्भातील माहिती पोलीस तपासात समोर आली होती. परंतु याप्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप कोणतीही भूमिका न घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सोबतच पुट्टेवार हिने रचलेल्या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज येथील काँग्रेस नेत्यालाही अभय दिल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही संशय व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपघात असल्याचे भासवून सुपारी देत सासऱ्याची हत्या करणाऱ्या गडचिरोली नगररचना विभागाची सहायक संचालक पुट्टेवार हिच्या गडचिरोलीतील अनेक कारनाम्यांची चर्चा आहे. पोलीस तपासादरम्यान तिच्या शेकडो कोटींच्या संपत्तीची माहितीही पुढे आली. शासकीय नोकरीत असतानाही अर्चना आणि तिचा भाऊ प्रशांत पार्लेवार याने गैरमार्गातून कोट्यवधीची संपत्ती जमा केली. संपत्तीच्या लालसेतून सासऱ्याची हत्या केली. या प्रकरणात दररोज नवीन माहिती पुढे येत असून अद्याप लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मौन बाळगले असल्याने शंका उपास्थित केल्या जात आहे.

हेही वाचा : गडचिरोली: नक्षलवाद्यांना सात गावांत प्रवेशबंदी; दहशत झूगारून गावकऱ्यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय

पुट्टेवार हिच्या कार्यकाळात हजार कोटींच्यावर मूल्य असलेल्या भूखंडांना अवैध मंजूरी देण्यात आल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. तिने जिल्ह्यातील भूमाफियांना हाताशी धरून हजारो कोटींच्या भूखंडांना नियमबाह्यपणे अकृषक केल्याची तक्रार करण्यात आली आहे. यात देसाईगंज येथील एका काँग्रेस नेत्याचा हात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस तपासातही त्याचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. संपत्तीच्या प्रकरणातून घडलेल्या या हत्याकांडात पोलिसांनी केलेल्या कारवाईवर शंका उपास्थित केल्या जात असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अद्याप कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे या विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. पोलीस कोठडीनंतर सर्व आरोपिंची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून आता पोलीस काय कारवाई करणार याकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेसचा ८५ ते ९० जागांवर दावा; खासदार प्रफुल पटेल म्हणतात, “विधानसभेला आम्ही…”

महसूल, भूमिअभिलेखमधील कर्मचारी ‘रडार’वर

गडचिरोली जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून पुट्टेवार हिच्या आशीर्वादाने अनेक नियमबाह्य कामे सुरू होती. यात महसूल, भूमिअभिलेख कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी सहभागी असल्याची माहिती आहे. यात सद्या मुलचेरा भूमिअभिलेख कार्यालयात कार्यरत एक कर्मचारी आणि पुट्टेवार हिच्या गैरकारभराची जिल्ह्यात चांगलीच चर्चा आहे. नगररचना विभागाच्या सहायक संचालक पाठीशी असल्याने या कर्मचाऱ्याने अल्पवाधित कोट्यवधीची मालमत्ता गोळा केली असून अनेक भूखंडात तो भागीदार असल्याचे कळते. सोबतच एका तत्कालीन तहसीलदाराने देखील आपले उखळ पांढरे केले. त्यामुळे यांची देखील चौकशी होऊ शकते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In archana puttewar supari murder case no action by anti corruption bureau ssp 89 css