भंडारा : गावातच मंडई बघण्यासाठी गेलेल्या एका १७ वर्षीय तरुणीचा १५ ते १७ टवाळखोरांनी विनयभंग केला. एवढेच नाही तर टवाळखोरांनी तिला बेदम मारहाणही केली. हा गंभीर प्रकार बेटाळा येथे उघडकीस आला. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी आठ तरुणांविरूद्ध गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा : उपराजधानीतील ‘लॉजिस्टिक हब’वर लक्ष केंद्रीत करणार; देवेंद्र फडणवीस यांची माहिती
गावात मंडई असल्याने आतेभावासोबत रात्री ही पीडित तरुणी मंडई बघण्यासाठी गेली होती. तरुणी व तिचा आतेभाऊ रस्त्यावर उभे असताना १५ ते १७ तरुण त्यांच्याजवळ आले व त्यांनी तरुणीचा विनयभंग केला. यानंतर तरुणांनी दोघांनाही काठीने बेदम मारहाण केली. यात ती गंभीररित्या जखमी झाली आहे. पीडितेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अभिमान चैताराम ठोंबरे (३२), कार्तिक जयराम ठोंबरे (२०), गोलू रामभाऊ ठोंबरे (२८), गौरव अशोक समृत (२०), विकी रामजी देशमुख (२४), विनोद साकुरे (२४), कैलास देशमुख (२८), शोभाराम साकुरे (३३) या ८ जणांना ताब्यात घेतले आहे.