भंडारा : राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत असताना भंडाऱ्यात एकाच दिवशी पोक्सोचे दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मागील सहा महिन्यांपासून एका १६ वर्षीय मुलीचा विविध ठिकाणी विनयभंग करणाऱ्या २८ वर्षीय विवाहित तरुणाविरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सतिष सुरेश कानझोडे, २८ वर्ष, रा. भोसलेनगर परसोडी असे आरोपीचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित ही अल्पवयीन असल्याची जाणीव असताना आरोपीने त्यांच्या आणि तिच्या घरी व घराचे मागे तसेच सुनसान ठिकाणी नेऊन अनेकदा तिचा विनयभंग केला आहे. त्यामुळे पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही परसोडी येथील एका विद्यालयात इयत्ता ११ वीत शिकत आहे. पीडितेचे वडील शिवणकाम करीत असून भंडारा येथील एका दुकानात ते कपडे शिवण्याचे काम करतात तर आई घरकाम करते.

पीडितेच्या घराजवळ आरोपी सतिष सुरेश कानझोडे याचे घर आहे. सुरेश हा विवाहित असून त्याला दीड वर्षाची मुलगी सुध्दा आहे. आरोपी सतिष कानझोडे आणि पीडितेच्या कुटुंबीयांचे घरघुती संबंध असल्याने पीडित मुलीचे आरोपीच्या घरी येणे जाणे असायचे. आरोपी सुध्दा पीडितेच्या घरी नेहमी येत जात असे. ऑगस्ट २०२४ मध्ये पीडित मुलगी घरी आलेली होती. त्यावेळी आरोपीची पत्नी आणि वडील घरीच होते.

मात्र त्यांची नजर चुकवत त्याने पीडितेच्या विनयभंग केला. त्यानंतर प्रत्येकवेळी पीडिता घरी आली की आरोपी तिचा विनयभंग करीत असे. डिसेंबर २०२४ मध्ये सतिष कानझोडे याची मुलगी भंडारा येथील खाजगी रुग्णालयात भरती असताना दवाखान्यात त्याचे ये-जा सुरू होते. दरम्यान एक दिवस पीडित मुलीला तिच्या वैयक्तिक कामानिमित्त भंडाऱ्याला जायचे होते. त्यावेळी आरोपीने स्वतःच्या दुचाकीने तिला भंडाऱ्याला आणून काम झाल्यानंतर सूनसान जागी नेऊन तिचा विनयभंग केला.

आठ ते दहा दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास आरोपी पीडितेच्या घराच्या मागे येऊन तिला आवाज देऊ लागला. आवाज ऐकून पीडिता मागे गेली असता त्याने अंधारात पुन्हा तिची छेड काढली. त्याच रात्री पत्नीसोबत भांडण झाले असे सांगून तो पीडित मुलीच्या घरी तिच्या वडिलांसोबत रात्रभर झोपला. भीतीपोटी पीडितेने कुणाला काही सांगितले नाही.

अखेर ४ दिवसांपूर्वी पीडितेने वरठी येथे राहणाऱ्या तिच्या मोठ्या आईजवळ इतक्या महिन्यात तिच्यासोबत घडलेले सर्व प्रकार सांगितले. मोठ्या आईने तिला पोलीस तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिने चाईल्ड हेल्प लाईनला फोन करून तक्रार करायची असल्याचे सांगितले. अखेर आज चाईल्ड हेल्प लाईन कार्यालयात जाऊन मुलीने आपबिती सांगितली आणि नंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने आरोपी सतिष कानझोडे याच्या विरोधात पोक्सो आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास जवाहर नगर पोलीस ठाण्याचे उप निरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहेत.