भंडारा : सध्या अन्नपाण्याच्या शोधात माकडांच्या टोळ्या गावात आणि शहराकडे स्थलांतर करीत आहेत. सकाळी किंवा संध्याकाळी गावात किंवा शहरी वस्तीत जाऊन माकडांच्या टोळ्या धुमाकूळ घालतात. मात्र, भंडाऱ्यात एक असे माकड आहे जे कुणाच्या घरी जात नाही तर थेट हॉटेलमध्ये जाऊन, टेबलवर बसून शांतपणे त्याच्या आवडत्या पदार्थांवर ताव मारते. तहान भूक भागली की शांतपणे निघूनही जाते.
मोठ्या बाजारातील हॉटेल सुरेश येथे आठवड्यातून दर शनिवारी आणि मंगळवारी हे माकड येत असल्यामुळे त्याच्यासाठी एक टेबल बुक ठेवत असल्याचे हॉटेल मालकाने सांगितले. भंडारा शहरातील अगदी गजबजलेल्या मोठा बाजार परिसरात बबन आणि सुरेश पंचभाई यांचं हॉटेल सुरेश आहे. त्यांच्या हॉटेलमध्ये हे माकड न चुकता आठवड्यातून दोन दिवस शनिवार आणि मंगळवारी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजताच्या दरम्यान येते. मागील दोन महिन्यांपासून हे माकडं या हॉटेलात येते. विशेष म्हणजे, हॉटेल मालक या दोन दिवशी त्याच्यासाठी एक टेबल राखून ठेवतात. सायंकाळी हे वानरराज आले की हॉटेल मालक त्याची आवडती डिश म्हणजे पापडी, जिलेबी आणि समोसा एका प्लेटमध्ये ठेऊन माकडाच्या समोर ठेवतात. अगदी शहाण्यासारखे हे माकड त्याचा आवडत्या खाद्यपदार्थांवर ताव मारून फस्त करते. पाणी पिऊन निघून जाते. आजवर त्याने कुणालाही इजा पोहोचवली नसल्याचे हॉटेल मालक सुरेश यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, हे वानर मंगळवार व शनिवार फक्त या दोन दिवशीच हॉटेलमध्ये येते. इतर दिवशी ते कुठे जाते, काय खाते याबद्दल कुणालाही काही ठावूक नाही, त्यामुळे ठराविक दिवशी येणाऱ्या या माकडाला बघण्यासाठी अनेक लोक हॉटेलमध्ये गर्दी करतात. सध्या या माकडाची पंचक्रोशीत जोरदार चर्चा आहे.