भंडारा : शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी उपक्रम असलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सोमवारी मोठ्या थाटामाटात येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील नागरिकांना खास एसटी बसद्वारे कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यात आले होते. मात्र, यापैकी अनेकांना आपल्याला येथे का आणले आहे? आपण कोणत्या नवीन योजनेचे लाभार्थी आहोत, हेच माहिती नसल्याचे दिसून आले. फोन आला आणि आम्ही बसमध्ये बसून आलो, असे काहींनी सांगितले. त्यामुळे शासनाच्या कार्यक्रमाला ओढून ताणून गर्दी जमवण्यात आली का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भंडारा जिल्ह्यात वेगवेगळ्या कारणांमुळे तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम अखेर सोमवारी पार पडला. या कार्यक्रमासाठी ३५० एसटीबसेसच्या माध्यामतून जवळपास २० हजाराहून अधिक नागरिक किंवा लाभार्थी आणण्याचे लक्ष्य होते. अनेक गावातील बचतगट आणि ग्रामपंचायतींकडून नागरिकांना फोन आणि मेसेज करुन कार्यक्रमाला जायचं असल्याचं सांगून सुनियोजित वेळी कार्यक्रमस्थळी आणण्यात आले. त्यांच्याकरिता नाश्ता, जेवण, पाणी, अशी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी या लाभार्थ्याशी ‘लोकसत्ता’ने संवाद साधला असता यांपैकी अनेकांना शासनाच्या नवीन योजना कोणत्या आहेत, त्यांना नेमका कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे, याची माहितीच नव्हती. काहींनी जुन्याच योजनेचे पैसे मिळत नसल्याची व्यथाही बोलून दाखविली.
हेही वाचा : बडनेरा-नाशिक दिवाळी विशेष मेमू नोव्हेंबर अखेरपर्यंत धावणार; प्रवाशांच्या उदंड प्रतिसादामुळे…
कार्यक्रमासाठी सकाळपासूनच मोठ्या संख्येने महिलांना आणण्यात आले होते. त्यांना बचतगटाच्या अधिकाऱ्यांकडून, ग्रामपंचायतींकडून फोन आणि मेसेज पाठवण्यात आला होता. त्यांच्यासाठी बसची सोय करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या महिलांनाही हा कार्यक्रम कशासाठी आहे, हे माहिती नव्हते.
हेही वाचा : ऐन गर्दीच्या हंगामात रेल्वे प्रवाशांची अडचण होणार; कारण काय…?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तीन नेते जिल्ह्यात पहिल्यांदाच एकत्र येणार होते. त्यामुळे गर्दी जमविणे आलेच. मात्र, सध्या दिवाळी आणि मंडईत नागरिक रमले आहेत. शिवाय अनेकांच्या सुट्ट्याही संपलेल्या नाहीत. त्यामुळे ओढून ताणून गर्दी जमा करण्यात आली की काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.