भंडारा : वरठी ग्रामपंचात कार्यालयात काम करणाऱ्या एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम तेथील ग्रामसेवकाने लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुखदेव विठोबा मते असे अन्यायग्रस्त कर्मचाऱ्याचे नाव असून मते यांनी आज वरठी पोलीस ठाण्यात ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
वरठी येथील हनुमान वॉर्ड मध्ये राहणारे सुखदेव विठोबा मते हे जवळपास दोन वर्षांपासून वरठी ग्रामपंचायत मध्ये नियमित कर्मचारी म्हणून नाली सफाई आणि पाईप लाईनचे काम करीत होते. ३० ऑक्टोबर रोजी ते सेवानिवृत्त झाले. सेवेत असताना त्याच्या पगारातून काही रक्कम भविष्य निर्वाह निधीच्या स्वरूपात कपात होत असे. त्यात सुखदेव यांच्या पगारातून १०९० रुपये कपात होत होते तर तेवढीच रक्कम अर्थात १०९० रुपये ग्राम पंचायतच्या वतीने त्यांच्या भविष्य निर्वाह निधीत जमा होत असे. याशिवाय भविष्य निर्वाह निधीची रक्कम अधिक मिळावी या हेतूने सुखदेव त्यांच्या पगारातून अतिरिक्त १००० रुपये कपात केले जात होते. सन २०२० ते २२ असे दोन वर्ष मते यांच्या पगारातून दरमहा एकूण ३१८० रुपये कपात होत असत. ही सर्व रक्कम ग्रामपंचायत सचिव तथा ग्रामसेवक दिगंबर गभने यांच्याकडे जमा राहत होते.
हेही वाचा : ‘एमपीएससी’चे दुर्लक्ष; टंकलेखन परीक्षार्थींचे भविष्य अंधारात, ‘किबोर्ड’च्या…
आठ महिन्यांपूर्वी सुखदेव मते सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यानंतर सुखदेव त्यांनी त्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेची मागणी ग्रामपंचायतकडे केली. यासाठी त्यांनी वारंवार ग्रामपंचायत कार्यालयाच्या वाऱ्या केल्या. मात्र ८ महिने लोटूनही त्यांना त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नव्हती. अखेर त्यांनी याबाबत सखोल चौकशी केली असता धक्कादायक वास्तव त्यांच्यासमोर आले. त्यांना पगारातून कपात होत असलेल्या भविष्य निर्वाह निधीवर तेथील ग्रामसेवकांने डल्ला मारल्याचे त्यांना कळले. ग्रामसेवक दिगंबर गभने यांनी २०२१ ते २२ या वर्षभरातील मते यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरलीच नसल्याची माहिती त्यांना मिळाली. जुलै २०२१ ते ऑक्टोबर २३ अशा १५ महिन्याचे ८९ हजार ४० रुपये अफरातफर करून ग्रामसेवक दिगंबर गभणे यांनी त्याच्या खिश्यात घातले असल्याचा आरोप मते यांनी केला आहे. गभने यांनी ही रक्कम कोणत्या शासकीय कामात खर्च केली किंवा वैयक्तिक लाभासाठी खर्च केली याबाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचे मते यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
आपल्या भविष्य निर्वाह निधीवर ग्रामसेवकांनी डल्ला मारल्याची गंभीर बाब लक्षात येताच सेवानिवृत्त कर्मचारी मते यांनी भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबंधाने पोलीस स्टेशन वरठी येथे तक्रार दाखल केली असून ग्रामसेवक गभने यांची चौकशी करून भविष्य निर्वाह निधीची रक्कम ताबडतोब देण्यात यांनी अशी मागणी मते यांनी केली आहे. या दरम्यान मागील ८ ते ९ महिन्यात ४ कर्मचारी वरठी ग्रामपंचायत कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहे. मात्र त्यांना अद्याप भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळू शकले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून १५ दिवसाच्या आत त्याचे पैसे देण्यासंदर्भात ग्रा. पं. ल पत्र देण्यात आले आहे. वरठी ग्रामपंचायत येथील कर्मचाऱ्यांवर कायम अन्याय होत असल्याचेही आता बोलले जात आहे. याच अनुषंगाने वरठी येथील सामाजिक कार्यकर्ते अश्विन मधुकर शेंडे यांनी २६ जून २०२४ रोजी माहितीच्या अधिकारात माहिती मगविली होती.यात वरठी ग्रामपंचायत कार्यालयातून सेवानिवृत्त झालेल्या २० कर्मचाऱ्यांपैकी किती कर्मचाऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत भविष्य निर्वाह निधी जमा करण्यात आला आहे, किती कर्मचाऱ्याना अद्याप मिळाला नाही, मिळाला नसल्यास त्याची कारणे काय अशी माहिती शेंडे यांनी माहितीच्या अधिकारात मागवली. ही माहिती पुरविण्याकरिता संकलित करण्यास काही कालावधी लागण्याची शक्यता आहे.
ही माहिती आपणास पुरविण्याकरिता संकलित करणे सुरु असून माहिती संकलित होताच आपणास माहितीच्या एकूण पृष्ठाची संख्या व त्याकरिता लागणारे एकुण शुल्क आपणास कळविण्यात येईल असे उत्तर जनमाहिती अधिकारी तथा ग्रामविकास अधिकारी दिगंबर गभने यांनी दिली. या प्रकरणात मोठा आर्थिक घोटाळा असल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी अश्विन शेंडे यांनी केली आहे.