भंडारा : २००४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना पराभूत करणारे भाजप नेते व माजी खासदार शिशुपाल पटले यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चांना आता उधाण आले आहे. महिनाभरापूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शिशुपाल पटले हे मुंबई येथे १५ किंवा १६ ऑगस्टला काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. पटले यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसचे जिल्ह्यात बळ वाढणार असून भाजपला मात्र मोठा धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे.
तुमसर विधानसभा मतदार संघातील शेतकरी आणि बेरोजगार यांच्या प्रश्नांना शिशुपाल पटले यांनी उचलून धरले. शिवाय बावनथडी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या १२ गावांना सिंचन व्यवस्था नसल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या आदी प्रश्नाकडे राज्य व केंद्र सरकार लक्ष देत नसल्याचा आरोप शिशुपाल पटले यांनी केला होता. याच कारणावरून पटले यांनी २५ जुलै रोजी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता, मात्र राज्यातील पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने त्यांची भेट घेऊन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही अथवा त्यांच्या प्रश्न वर चर्चा सुध्दा केली नाही, त्यामुळेच पटले यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते.
हेही वाचा : तोट्यातील ‘एसटी’ नफ्याच्या उंबरठ्यावर, झाले असे की…
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांचा हा निर्णय भाजपसाठी फार मोठा झटका मानला जात आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात पोवार समाज मोठ्या प्रमाणात असून समाजाची ताकद भाजपकडे अधिक आहे. माजी खासदार शिशुपाल पटले यांच्यावर पक्ष सोडण्याची वेळ येत असेल तर या समाजाची भाजपची वोटबँक सुध्दा आपली राजकीय दिशा बदलू शकते. शिशुपाल पटलेंच्या रूपाने एक चांगला नेता भाजपने गमावला असून भाजपाला झालेली क्षती भरून निघणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे खासदार असताना पटले यांनी कोणतीही विशेष कामे केलेली नाहीत, शिवाय मधल्या काळात शिशुपाल पटले राजकारणात सक्रिय नव्हते त्यामुळे त्यांच्या जाण्याने भाजपला विशेष फरक पडणार नसल्याचे आणि शिशुपाल पटले यांचा हा केवळ विधान सभा निवडणूक लढण्याचा मोह असल्याचे मत एका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्त केले.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिशुपाल पाटील यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. त्यांनी म्हटले होते की, जनसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले. पक्षामध्ये सध्या जुन्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे. भाजपमध्ये लोकशाहीचा अस्त झाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपा आता राहिली नाही. खऱ्या कार्यकर्त्यांचा भाजपला विसर पडू लागला आहे. कर्मठ सामान्य कार्यकर्त्याची किंमत पक्षाला नाही, असे शिशुपाल पटले यांनी म्हटले होते.
हेही वाचा : बुलढाणा : वादग्रस्त भक्तीमहामार्ग विरोधात शेतकरी उतरले पैनगंगेत…
भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा का दिला …
महागाई, बेरोजगारी, वीजेचे अवास्तव वाढलेले दर, यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि वारंवार नैसर्गिक आपत्तीत होणारे नुकसान यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन राशी देण्याची महाराष्ट्र सरकारची घोषणा हवेतच आहे. उन्हाळ्यात रब्बी पिकाची जे नुकसान झालं त्याची अद्याप भरपाई मिळालेली नाही, पीक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. मात्र, राज्य सरकारकडून सातत्यानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत असल्याचे सांगत शिशुपाल पटले यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला होता.
© The Indian Express (P) Ltd