लोकसत्ता टीम
भंडारा: नागरिकांना बांधकाम योग्य वाळू स्वस्त दरात उपलब्ध करुन देण्यासोबतच अनधिकृत उत्खननास आळा घालण्याच्या दृष्टीने नवीन वाळू धोरण राज्यात राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक १६ हजार ४७३ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यात आली असून त्यापैकी १० हजार १६५ ब्रास वाळू विक्री झाली आहे. नागरिकांचा यास उत्तम प्रतिसाद मिळत असून मोठया प्रमाणात ऑनलाईन नोंदणी करून वाळूची मागणी होत आहे.
नवीन वाळू धोरणानुसार नागरिकांना आवश्यक असेलेल्या रेतीसाठी ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यानुसार ६०० रुपये ब्रास या प्रमाणे वाळू उपलब्ध होणार असून वाहतुकीची सशुल्क सुविधा असल्याने घरपोच वाळू मिळत आहे. राज्य व केंद्र शासनाच्या विविध विकास प्रकल्पासाठी वाळू उपलब्ध व्हावी. यासाठी संबंधित विभागाने मागणी केल्यास नियमानुसार गट अथवा घाट राखून ठेवण्यात येणार आहे.
हेही वाचा… गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयातील रक्त पेढीत रक्ताचा तुटवडा?
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत व आर्थिकदृष्टया मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांच्या घरकुलासाठी सक्षम प्राधिकारी यांनी यादी सादर केल्यास वाळू डेपोतून विनामुल्य वाळू उपलब्ध होणार आहे. यासाठी वाहतुकीचा खर्च लाभार्थ्यांना करावा लागणार आहे. याला गरजू नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे होत असलेल्या नोंदणीवरून दिसून येत आहे.
हेही वाचा… वर्धा: मान्यता रद्द करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशाचे काय होणार?
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाळू केंद्रावर जनतेच्या मागणीनुसार वाळू साठा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. राज्यात सर्वाधिक साठा भंडारा जिल्ह्यातील वाळू केंद्रावर असून १६ हजार ४७३ ब्रास रेती उपलब्ध आहे. गरजू नागरिकांनी ऑनलाईन पध्दतीने १४ हजार ५१८ ब्रास वाळूसाठी आपली मागणी नोंदविली आहे. जिल्ह्यात ४ ठिकाणी प्रमुख साठा केंद्र असून त्यापैकी तीन केंद्र सुरू झाले आहेत. या केंद्रांवर एकूण १६९८ नागरिकांनी १२ हजार १२० ब्रास वाळू खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.