भंडारा : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारार्थ येणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या प्रचारसभेला सुरुवात होणार होती, मात्र तब्बल साडेतीन तास लोटूनही मुख्यमंत्र्यांचे आगमन न झाल्याने सभास्थळी झालेली गर्दी आता ओसरू लागली आहे. निवेदकासह खुद्द उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनाही उपस्थित नागरिकांना खिळवून ठेवणे आता अशक्य झाले आहे. सभेसाठी आलेले नागरिक आता आल्या पावली परत जात असल्याने भोंडेकर यांचा चेहरा पडला.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. उमेदवारांच्या प्रचारासाठी आता स्टार प्रचारक आणि पक्षातील मोठमोठे नेते हजेरी लावत आहेत. भंडारा पवनी विधान सभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पवनी येथे येणार आहेत. त्यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली होती. दुपारी साडेतीन वाजता सभेला सुरवात होणार होती. दुपारी दोन वाजता पासून कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी यांच्यासह नागरिकांनी देखील सभास्थळी गर्दी केली. मुख्यमंत्र्यांची वाट पाहून पाहून नागरिक विशेषतः महिला वर्ग त्रस्त झाला आणि अखेर सभेला पाठ देतं अनेकांनी घराची वाट धरली.
हेही वाचा : एसटी कर्मचाऱ्यांमध्ये ‘दिवाळी भेट’ची आशा पुन्हा पल्लवीत, नवीन घडामोडी जाणून घ्या…
मंचावर उपस्थित असलेले महायुतीचे नेते आणि पदाधिकारी यांची एका पाठीमागे एक भाषणे झाली. सर्वांची भाषणे संपली तरी मुख्यमंत्री शिंदे पोहोचले नाही त्यामुळे आता उपस्थितांना कसे खिळवून ठेवायचे असा प्रश्न आयोजक आणि नरेंद्र भोंडेकर यांच्या समोर पडला. वारंवार विनंती करूनही महिला आणि नागरिक सभास्थळावरून निघून गेले.