भंडारा : लग्न समारंभासाठी नागपूरहून रांजणगाव छत्तीसगडला जायला निघालेल्या पती पत्नीवर काळाने घाला घातला. मागेहून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. आज सकाळी साडे सहा वाजताच्या सुमारास चिखली फाटा येथे हा अपघात घडला. या अपघातात नागपूर येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. रोशन महावीर साहू, वय २८वर्ष आणि चांदणी रोशन साहू, वय २३ वर्ष रा. नवीन पारडी असे मृत पती पत्नीचे नाव आहे.
नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिखली फाटा येथे सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास दुचाकीवरून छत्तीसगड कडे जाणाऱ्या दिशेने मागून येणाऱ्या एका अज्ञात महिंद्रा पिकअप वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी स्वार पती-पत्नी सुमारे शंभर फूट अंतरापर्यंत फेकले गेले. या अपघातात नागपूर येथील नविन पारडी येथील चांदणी आणि रोशन या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. जवाहर नगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार भिमाजी पाटील, पोलीस उप निरीक्षक पुरुषोत्तम राठोड, पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर हाके, महेश कडव हे घटनास्थळी दाखल झाले असून अपघात स्थळावरून फरार झालेल्या महिंद्रा पिकअप वाहनाचा शोध सुरू आहे.