भंडारा : वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील बेटाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने प्राथमिक उपचार वेळेवर न मिळाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. पार्वता राऊत, असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर आरोग्य केंद्रासमोर बराच वेळ तणावाचे वातावरण होते.
हेही वाचा : हनुमान चालिसाला विरोध केला, त्यांचे लंकादहन झाले; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
बेटाळा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आजूबाजूच्या परिसरातील शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून दुसरे पद रिक्त आहे. येथे कार्यरत सर्व आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर मुख्यालयी न राहता बाहेरगावाहून येणे-जाणे करतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना अनेकदा होत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. मागील सहा महिन्यांत डॉक्टर उपस्थित नसल्याने तीन रुग्ण दगावले असून ही चौथी घटना असल्याचेही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. रात्रीच्या वेळी प्रकृती बिघडल्यास लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचेच आरोग्य धोक्यात येते. जिल्हा आरोग्य विभागाबाबत नागरिकांमध्ये रोष आहे.