भंडारा : मोहाडी तालुक्यातील मांडेसर येथे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू कारेमोरे यांचा समर्थक त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त मिठाई, टिफिन बॉक्स आणि अन्य साहित्य वाटप करीत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सदर प्रकरणी भरारी पथकाने साहित्य जप्त केले होते, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली आणि हे प्रकरण मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचले. अखेर तुमसरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार चरण वाघमारे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार राजू कारेमोरे यांचे बंधू विजय कारेमोरे यांच्यासह दोघांच्याही प्रत्येकी ७५ समर्थकांवर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा…मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”

राष्ट्रवादी (शरद पवार)चे उमेदवार माजी आमदार चरण वाघमारे हे त्यांच्या असंख्य समर्थक आणि कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार) उमेदवार राजू कारेमोरे यांचे बंधू विजय कारेमोरे हे सुद्धा त्यांच्या समर्थकांसह ठाण्यात पोहोचले. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहितेचा आणि जमावबंदीचा आदेश झुगारून पोलीस ठाण्यातच रात्री उशिरापर्यंत ठाण मांडले होते. दरम्यान दोन्ही गटाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या विरोधात मोहाडी ठाणेदार सुरेश बेलखेडे यांच्या तक्रारीवरून १५० हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा…नागपुरात डासांचा उद्रेक…अन् काँग्रेस उमेदवार प्रचार सोडून फाॅगिंग…

कोणावर गुन्हे दाखल झाले?

पोलिसांनी चरण वाघमारे (शरद पवार पक्षाचे विधानसभा उमेदवार)नंदू रहांगडाले (सभापती पंचायत समिती, तुमसर) यांच्यासह ७५ कार्यकर्ते व राष्ट्रवादी ( अजित पवार) गटाचे विजय कारेमोरे (आमदार राजू कारेमोरे यांचे बंधू) रितेश वासनिक (सभापती पंचायत समिती, मोहाडी) यांच्यासह ७५ कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल केले.

हेही वाचा…मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…

नेमके प्रकरण काय?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्याने त्याच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त गावात मिठाईचे वाटप केले. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांने ही मिठाई वाटप म्हणजे, मतदारांना प्रलोभन असल्याची तक्रार निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला दिली. यावरून भरारी पथकाने मिठाईचे सर्व साहित्य जप्त केले. यावरून तुमसर विधानसभेतील मांडेसर या गावात सोमवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपसात भिडलेत. दोन्ही राष्ट्रवादीच्या समर्थकांनी एकमेकांविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार मोहाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. यावरून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. दरम्यान, शरद पवार गटाचे उमेदवार चरण वाघमारे हे आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचीही माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे शेकडो कार्यकर्ते मोहाडी पोलीस ठाण्यात पोहोचल्याने काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त मोहाडी पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आल्यानंतर प्रकरण निवळले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhandara mandesar clash between workers of both ncp factions ksn 82 sud 02