भंडारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्यात जल पर्यटन करताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना घेऊन जाणारी बोट बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्याच वेळी हा अपघात घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा जिल्हा दौऱ्या दरम्यान जल पर्यटन करताना प्रसारमाध्यमांचे १० ते १५ प्रतिनिधी एका बोटीत होते. हे सर्व माध्यम प्रतिनिधी नागपूरचे असल्याचे सांगण्यात येते. एका बोटीत मुख्यमंत्री तर दुसऱ्या बोटीत माध्यम प्रतिनिधी होते. काही अंतरावर गेल्यानंतर माध्यम प्रतिनिधीची बोट एका खडकावर आदळून तिचे तीन तुकडे झाल्यचे सांगण्यात येते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जल पर्यटन करताना चित्रांकन करण्यासाठी दुसऱ्या एका बोटीत प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी देखील होते. मात्र जल पर्यटना दरम्यान मुख्यमंत्र्यांचे फोटो काढण्याकरिता सर्व माध्यम कर्मी एका बाजूला आले त्यामुळे बोट असंतुलित झाली. मात्र तेथे असलेल्या बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब सर्व माध्यम प्रतिनिधीना पाण्याबाहेर काढले. यात कोणताही अनुचित प्रकार घडला नसून क्षमतेनुसार प्रतिनिधींनी बोटीत असल्याचे मतांनी यांनी सांगितले.

हेही वाचा : भंडारा : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध, काँग्रेसने दाखवले काळे झेंडे

वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे सोमवारी दुपारी मुख्यमंत्र्याच्या हस्ते भूमिपूजन झाले. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री भंडारा येथील रेल्वे मैदानावर पोहोचले तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जल पर्यटन करताना बोट उलटल्याची वार्ता जाहीर सभेच्या कार्यक्रम स्थळी वाऱ्यासारखी पसरली. या सर्व प्रकारानंतर बोट नेमकी कोणाची उलटली ?? माध्यम प्रतिनिधींची की आमदारांची ?? अशा उपहासात्मक चर्चांना ही चांगलेच उधाण आले.

हेही वाचा : VIDEO : पाचवेळा मातृत्त्व, १७ पेक्षा अधिक बछड्यांची आई; क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरही आहे चाहता जिचा, अशी ती…

काय आहे प्रकल्प ?

वैनगंगा नदीच्या पात्रावर असलेल्या गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर हा जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्पा साकारला जात आहे. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरच या प्रकल्पाची उभारणी होत असल्याने दोन्ही जिल्ह्यातील सुमारे १० हजाराहून अधिक बेरोजगारांना येथे रोजगार उपलब्ध होईल असे म्हटले जात आहे. या प्रकल्पासाठी १०२ कोटींचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhandara media representative s boat capsized during chief minister s visit ksn 82 css