भंडारा : मोबाईल ही आज काळाची गरज ठरत आहे, मात्र हाच मोबाईल जीवघेणा ठरू शकतो याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. अगदी मानसिक आजारांच्या विळख्यापासून ते फ्रॉडपर्यंत मोबाइलमुळे अनेक घटना घडत आहेत. याच मोबाईलमुळे चक्क एका मुख्याध्यापकाला प्राण गमवावे लागले. ही धक्कादायक घटना साकोली तालुक्यातील सिरेगावबांध या गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्याध्यापकाने खिशात ठेवलेल्या मोबाईलचा भयंकर स्फोट झाला. या स्फोटात मुख्याध्यापक गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेली व्यक्ती जखमी झाली आहे. सुरेश संग्रामे असं मृत शिक्षकाचं नाव आहे तर नत्थु गायकवाड असं जखमी असलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

हे ही वाचा… दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती, निर्णयास ग्राहक पंचायतीचा विरोध

हे ही वाचा… रस्ते फक्त माणसांसाठीच असतात का..? एका बिबट्याचा सवाल

प्राप्त माहितीनुसार, सुरेश संग्रामे कुरखेडा तालुक्यातील कसारी जि.प. प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. संग्रामे आणि गायकवाड हे दोघेही एका कार्यक्रमासाठी जात असताना अचानक संग्रामे यांच्या खिशातल्या मोबाईलचा फोनचा स्फोट होऊन कपड्याला आग लागली. त्या आगीत भाजल्याने त्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बाईकवर मागे बसलेले नत्थु गायकवाड हे गाडीवरुन पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. मृत सुरेश भिकाजी संग्रामे हे गडचिरोली जिल्हा परिषदेच्या देसाईगंज/वडसा पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कसारी येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आहे. नत्थु यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संग्रामे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhandara mobile phone explodes in pocket while riding bike principal died ksn asj