भंडारा : उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे आता आईसक्रीम खाण्याकडे सर्वांचाच कल वाढला आहे. परिणामी आईस्क्रीमची मोठ्या प्रमाणात मागणी देखील वाढली आहे. मात्र उन्हाळयात आनंददायी वाटणारी ही आईसक्रीम आपल्यासाठी विष ठरू शकते. कारण कालबाह्य तारीख उलटून गेलेल्या आईसक्रीम पॅकवर नवीन स्टिकर लावून त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. दिनशॉज कंपनीची एकावर एक फ्री असलेल्या एक्सपायरी स्टिकरवर नवीन स्टिकर चिपकवून आईस्क्रीमची विक्री केली जात आहे. तुमसर येथील रिलायन्स मार्टमध्ये आईसक्रीम खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका ग्राहकाला ही बाब लक्षात आल्यानंतर रिलायन्स मार्टचा प्रताप उघड झाला.

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले असून अनेक जण आता आईस्क्रीम खाण्यावर जोर देत आहेत. ठिकठिकाणी आईस्क्रीमची स्टॉल, दुकाने लावण्यात आले आहेत. वेगवेगळ्या कंपन्या यात असून याच्या पॅकिंगवर निर्मित व मुदत संपण्याची तारीख यावर छापण्यात आलेली असते. असे असले तरी मुदत संपलेले आईस्क्रीम विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

तुमसर येथील अभिषेक भुरे हा तरुण तुमसर शहरात असलेल्या रिलायन्स स्मार्ट मॉलमध्ये आईस्क्रीम खरेदी करायला गेला असता, त्याला एक्सपायरी झालेली आईस्क्रीम विकत देण्याचा प्रयत्न मॉलमधील कर्मचाऱ्यांनी केला. अभिषेक भुरे याने दिनशाज कंपनीची संत्रा बर्फी फ्लेवरच्या आईस्क्रीमची मागणी केली. त्याला त्या आईस्क्रीमचा बॉक्स देण्यात आला, त्या बॉक्सवर एकावर एक दोन स्टिकर लावल्याचे त्याच्या लक्षात आले. वरचा स्टिकर काढला असता खालील स्टिकरवर आईस्क्रीमची मॅन्युफॅक्चरिंग तारीख निघून गेल्याने ती एक्सपायरी झाल्याचं लक्षात आलं. त्या एक्सपायरी झालेल्या तारखेवर नवीन स्टीकर लावून तो विक्री करण्यात येत असल्याचा गोरखधंदा उघडकीस आला. त्यामुळे आता आईस्क्रीम खाणाऱ्यांनी सावधानगिरी बाळगून आईस्क्रीम खरेदी करण्याचा आणि स्वतःच्या जीवनाची काळजी घेण्याची गरज आहे.