भंडारा : सध्या सूर्य आग ओकत आहे. पारा ४५ अंशाच्या पार झाला आहे. उष्ण लहरींमुळे नागरिकांना त्रास जाणवू लागला आहे. अशातच एका एसटी बस चालकाला उष्णतेमुळे धावत्या बसमध्ये भोवळ आली आणि अनियंत्रित बस सामोर उभ्या कारला धडकली. बसची गती कमी असल्याने सुदैवाने या बसमधून प्रवास करणाऱ्या ५५ प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही.

ही घटना जवाहर नगर ठाणे पेट्रोल पंपाजवळील उड्डाण पुलाजवळ दोन दिवसांपूर्वी रात्री ७.३० वाजता दरम्यान घडली. बसचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.

प्राप्त माहितीनुसार, तुमसर आगाराची एसटी बस क्र. एमएच ४० वाय ५८१८ ही राजुरा येथून तुमसरमार्गे नागपूरकडे जात होती. चालक राजू रामदास ठाकरे (रा. तुमसर) याने ठाणे पेट्रोलपंप थांब्यावर बस थांबवली आणि नंतर बस पुढे नेण्यास सुरुवात केली. बस सुरू होताच चालकाला अचानक भोवळ आल्याने बसचे नियंत्रण सुटले आणि ती थेट कारला( क्रमांक ४० सी एस ३०२३) धडकली.

अपघाताच्या वेळी कारमध्ये कोणीही नव्हते. बसमधील ५२ प्रवाशांना तात्काळ सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यात आले आणि दुसऱ्या बसने त्यांना इच्छितस्थळी पाठवण्यात आले. चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. अशा घटना टाळण्यासाठी उन्हाळ्यात अतिरिक्त दक्षता घ्यावी आणि वाहनचालकांची आरोग्य तपासणी अनिवार्य करावी, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला केले आहे.