भंडारा : दोन दिवसांपूर्वी शेतात पाइप बदलवण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर हल्ला करून ठार करणाऱ्या आणि मागील काही दिवसांपासून लाखांदूर चौरस भागात दहशत निर्माण करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली होती. अखेर काल मध्यरात्री या वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले.
लाखांदूर तालुक्यातील गवराळा, डांभेविर्ली, टेंभारी, खैरी/पाट, असोला, सावरगाव, चौरस भागात या वाघाचा मुक्तसंचार होता. येथील ग्रामस्थांना दिवसाढवळ्या अनेकदा तो संचार करताना दिसत असे. या वाघाने अनेक पाळीव जनावरांची शिकारी केली होती. दरम्यान, ३० मार्च रोजी खैरी येथील शेतात दबा धरून बसलेल्या या वाघाने डाकराम देशमुख या शेतकऱ्याचा बळी घेतला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी या वाघाला जेरबंद करण्याची मागणी लावून धरली. या मागणीनुसार दोन दिवसांपासून वन विभागाची चमू वाघावर पाळत ठेवून होती.
जिल्हा वनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली साकोलीचे सहायक वनसंरक्षक संजय मेंढे, भंडाराचे सहाय्यक वनसंरक्षक निलख, लाखनीचे सहायक वनसंरक्षक भोंगाडे, लाखांदूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांच्या नेतृत्वात काही वनक्षेत्रपाल आणि १५ पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले. यासाठी कॅमेरे, ड्रोन कॅमेरा तसेच चार मचान आणि चार शार्पशूटर्सची नियुक्ती करण्यात आली होती. माचणीला शिकार बांधून वाघावर नजर ठेवण्यात आली. शिकार करण्यासाठी आलेल्या वाघाला शार्पशूटरने डार्टचा वापर करून बेशुद्ध केले आणि वाघाला जेरबंद करण्यात आले. त्यानंतर नागपूरच्या गोरेवाडा येथील राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात वाघाला हलवण्यात आले. वाघाला जेरबंद करण्यात आल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.