भंडारा : एका घरात पडलेले भगदाड बुजवण्यासाठी घरातील मंडळींनी दगड टाकले. मात्र भगदाड काही भरेना. आतमध्ये उतरून पाहिले असता भंबेरी उडाली. तब्बल आठ ते २० फुटापर्यंतचे तीन भुयार सापडले. हे भुयार घरापर्यंतच सीमित आहे. हा प्रकार भंडारा तालुक्यातील नांदोरा येथे रविवारला महादेव बिसन कोरचाम यांच्याकडे उघडकीस आला.

माहितीनुसार, भंडारा तालुक्यातील शहापूरपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या नांदोरा येथे महादेव कोरचाम यांचे घर आहे. २०१० मध्ये त्यांनी सिमेंटचे पक्क्या घराचे बांधकाम केले होते. होळीच्या दोन दिवसांपूर्वी घराच्या उजव्या बाजूला जवळपास दोन बाय चार फूट लांबीचे भगदाड पडले बाजूलाच नाली आहे. हा भाग कसा खचला, याचा शोध घेतला असता, कदाचित माती खचून खड्डा पडला असावा असा प्राथमिक अंदाज होता.

महादेव कोरचाम यांच्या मुलांनी तो खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला. मात्र दगड घालूनही खड्डा बुजत नव्हता. सरतेशेवटी कोरचाम यांचा मुलगा आशिष हा खाली उतरला. आणि त्याने जे पाहिले ते पाहून तो थक्क झाला. पूर्व, उत्तर आणि पश्चिम दिशेला जवळपास आठ फूट ते वीस फुटांपर्यंतचे तीन भुयार आढळले. मातीचा हा थर खचलेला आढळला. काही ठिकाणी ओलसरपणाही जाणवला.

नेमका काय असेल प्रकार?

जवळपास चार दिवसांपासून हा भूस्खलनाचा प्रकार घरच्या आतमध्ये घडत होता. मात्र त्याची प्रचिती धुळवळीच्या दिवशी आली. पोर्चमध्ये खड्डा पडल्यानंतर आत मध्ये मोठे भुयार तयार आहे हे पहिल्यांदाच निदर्शनास आले. मातीचा आकृतीबंध असलेल्या या जमिनीत पाण्याचा प्रवाह असल्याकारणाने व खडकाळ भाग नसल्याने हा भौगोलिक प्रकार घडल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसून आले.

बऱ्याच वर्षांपूर्वी होती येथे विहीर…

ज्या ठिकाणी कोरचाम यांनी घर बांधले आहे. तिथे ६० ते ७० वर्षांपूर्वी मोठी विहीर असल्याचेही सांगण्यात येत आहे. याबाबत खुद्द महादेव कोरचाम यांनी विहीर असल्याच्या बाबीला दुजोरा दिला. तर घराच्या मागे ४०० मीटर अंतरावरच तलाव आहे. तलाव आणि विहीर यांच्यामधील अंतर्गत पाण्याचा प्रवाहही या भगदाड करण्यासाठी कारणीभूत असू शकतो का? असा निष्कर्षही या निमित्ताने समोर आला. उल्लेखनीय म्हणजे पश्चिम ते पूर्व असा या जमिनीचा उतार आहे.

घटनास्थळी अधिकारी दाखल

रविवारपासून ही घटना उघडकीला आल्यानंतर गावात विविधांगी चर्चेला उधाण आले. घराला भगदाडच पडले, भुयार दिसत आहे. अलीकडून पलीकडे जाता येते, यासह आदी चर्चाना ऊत आले होते. घटनास्थळी भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक भूवैज्ञानिक ललित वायकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांच्यासह महसूल प्रशासनातील अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी दाखल झाले. एसडीओ बालपांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सहायक भूवैज्ञानिक वायकर हे भगदाडमध्ये उतरून नेमका प्रकार काय याची शहानिशा केली. घटनास्थळी जमलेली गर्दी पाहता पोलिसांनी तेथे बंदोबस्त लावला होता.

“घडलेला प्रकार हा सदोष बांधकामामुळे घडल्याचे निदर्शनास येत आहे. कोरचाम कुटुंबियातील कोणत्याही सदस्याला कुठलीही हानी झालेली नाही. सद्यस्थितीत त्यांची सुरक्षितस्थळी व्यवस्था करण्यात आली आहे.”

अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा

भौगोलिक कारणांमुळे – वायकर

कोरचाम यांचे जिथे घर आहे तेथील भाग हा संपूर्ण मातीच्या थराचा आहे. या घटनेला भौगोलिक कारणच निमित्त आहे. सॉईल ट्रान्सफरेशनमुळे पोकळी निर्माण झाली आणि ते ठिकठिकाणी खचलेले आढळले, असे वरिष्ठ भूवैज्ञानिक, (पाणीपुरवठा विभाग जि. प. भंडारा.) ललित वायकर यांनी सांगितले.