भंडारा : शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या एका वाघिणीला शुक्रवारी जेरबंद केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आणखी एका वाघिणीला पिंजऱ्यात कैद करण्यात वन विभागाला यश आले आहे. आंतरजिल्ह्याच्या दाट जंगलातून भरकटून वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील डांभेविरली, टेंभरी, गवराळा आदी गावांच्या शेत क्षेत्रात आलेल्या एका वाघिणीने मागील एक महिन्याच्या कालावधीत पाळीव जनावरांसह काही वन्य प्राण्यांचीही शिकार केली होती. यामुळे परिसरातील शेतकरी, पशुपालक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

शिकार उपलब्ध न झाल्यास माणूस-वन्यजीव संघर्ष होण्याची शक्यता लक्षात घेता वन विभागाकडून गवराळा परिसरात पिंजऱ्यासह मचान उभारून त्या मचाणीला शिकारी बांधून ठेवण्यात आली. ५ एप्रिल रोजी रात्री ७ वाजता गवराळा शेत परिसरात वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध करत तिला सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात कैद करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, एका महिन्यापूर्वी आंतर जिल्ह्याच्या दाट जंगलातून वैनगंगा आणि चूलबंद नद्यांच्या किनाऱ्यावरील चौरस परिसरातील विविध गावांच्या शेतात दोन वेगवेगळ्या वाघिणी आल्या होत्या. यामुळे संपूर्ण भागात नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण होते. या दोन वाघिणींपैकी एका वाघिणीने ३० मार्च रोजी खैरी/पट येथील डाकराम देशमुख (४०) या शेतकऱ्याचा बळी घेतला होता. नागरिकांच्या आक्रोशानंतर दोन दिवसांत ती वाघीण पकडून गोरेवाडा प्रकल्पात हलवण्यात आली होती.

मात्र, दुसरी वाघीण वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावरील गावांमध्ये पाळीव जनावरांची शिकार करत होती. ५ एप्रिल रोजी तिने गवराळा येथे एक शिकार केली. सततच्या शिकारीमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीती पसरली होती.

या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मागणीची दखल घेत उपवन संरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने आणि इतर वन कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शार्प शूटरसह पिंजरा, मचान आणि ट्रॅप कॅमेरे लावून वाघिणीस शिकारीचे आमिष देण्यात आले. नियोजितप्रमाणे वाघीण मचान परिसरात शिकारीसाठी आली असता शार्प शूटरने तिला डार्ट मारून बेशुद्ध केले. बेशुद्ध होताच तिला तात्काळ पिंजऱ्यात कैद करण्यात आले.

गेल्या एका महिन्यात या दोन वेगवेगळ्या वाघिणींच्या दहशतीमुळे त्रस्त असलेल्या शेतकरी आणि नागरिकांना आता दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. माणूस-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने वेळेत केलेल्या या दोन्ही कारवायांबद्दल नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे.