भंडारा : विदर्भातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आंभोर्याचा लौकिक आहे. याच आंभोऱ्यात आंभोरा केबल स्टेड ब्रीज उभारण्यात आला असून या ब्रिजवर अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील गोल्डन गेटच्या ब्रिजची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. नागपूर, भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील या आंभोरा केबल स्टेड ब्रीजचे आज लोकार्पण असून पुलावरच ४० फूट उंचीवर ‘स्काय गॅलरी’ आहे.
वैनगंगा, कन्हान, आंब, मुरजा आणि कोल्हारी या पाच नद्यांचं विहंगम संगम, दाट वनराई आणि टेकडीवर असलेलं महादेवांचं मंदिर असा विहंगम दृश्य असलेला निसर्ग आपल्याला भेटतो ते नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवर. मात्र इतकं महत्त्वाचं असूनही हा परिसर गेली अनेक वर्षी दुर्लक्षित होता. त्यातही दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा पूल नसल्यामुळे नागरिकांना बोटीच्या सहाय्यानं नदीतून जीवघेणा प्रवास करावा लागला. याप्रश्नी अनेक वेळा प्रशासनाचे लक्ष वेधल्यानंतर आंभोरा ब्रीजच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली. अखेर हा ब्रीजचं काम पूर्ण झालं असून आज या ब्रीजचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे.
हेही वाचा : काँग्रेसची विभागीय बैठक गडचिरोलीत; प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला राहणार उपस्थित
विदर्भातील एक महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणून आंभोर्याचा लौकिक आहे. ब्रम्हगिरी पर्वतरांगांच्या मधोमध वाहणाऱ्या वैनगंगा, कन्हान, आंब, मुरजा आणि कोल्हारी या पाच नद्यांचा संगम आहे. याच नदीच्या विस्तीर्ण पात्रावर अमेरिकेतील लॉस एंजिल्स येथील गोल्डन गेटच्या ब्रिजची प्रतिकृती उभारली गेली आहे. जर्मन टेक्नॉलॉजीने हा केबल स्टेड ब्रीज तयार केला आहे. या ब्रीजचं आज १३ जानेवारी २०२४ रोजी लोकार्पण होणार आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंभोरा ब्रीजच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
या पुलावर स्काय गॅलरी तयार करण्यात आली आहे. तसेच, यावर चढण्यासाठी ४० फूट उंचीची लिफ्टही लावण्यात आली आहे. गॅलरीवर उभे राहून नदी पात्र आणि परिसराचं विहंगम दृश्य पाहाता येणार आहे. हा पूल सुरू होत असल्याने नागपूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील सुमारे २५ गावातील नागरिकांना भंडारा जिल्ह्याशी थेट संपर्क करणं शक्य होणार आहे. किंबहुना या भागातील शेतकरी असो किंवा नागरिक यांना भंडारा येथील मार्केटचा आता थेट लाभ घेता येणार आहे. या सोबतच शिक्षण, आरोग्यासंदर्भातील सोयीसुविधांसाठीही हा पूल सोयीचा ठरणार आहे. या पुलामुळे सुमारे ७० ते ८० किलोमीटरचं अंतर कमी होईल आणि वेळेचीही बचत होणार आहे.
नागपूर आणि भंडारा जिल्ह्याच्या सीमेवरील अंभोरा ब्रीजची वैशिष्ट्य काय?
पुलाच्या निर्मितीसाठी १७६ कोटी रुपये खर्च केबल स्टेड ब्रिज पुलाची लांबी ७०५.२० मीटर असून १५.२६० मीटर रुंदीचा हा पूल असून त्यावर दोन्ही बाजूने फुटपाथ आहे. पुलावर ४० फूट उंचीवर स्काय गॅलरी. गॅलरीवर चढण्यासाठी १०२० किलो क्षमतेची लिफ्टची व्यवस्था आहे. गॅलरीवर एकाचवेळी १०० व्यक्ती उभे राहून निसर्ग सौंदर्य बघू शकतात.
हेही वाचा : अमरावती : गेल्या वर्षभरात प्राणांतिक अपघातांत गेले ३५९ जीव
टी अँड टी कंपनीनं ब्रीजचं बांधकाम पूर्ण केले आहे. कोरोना आणि महापुराला सामोरे जावून ४ वर्षात पुलाचं बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान, गेल्यावर्षी मे महिन्यात या पुलाचं उद्घाटन होणार होतं, मात्र त्याचं उद्घाटन न झाल्यानं नागरिकांची अडचण होत होती. या पुलावरील वाहतूकही ठप्प झाली होती. त्यानंतर आज या पुलाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हिरवी झेंडी मिळाली आहे.