बुलढाणा : प्रवाश्यांनी खचाखच भरलेली काळी पिवळी भरवेगात उलटून थेट खड्ड्यात पडली. यामुळे झालेल्या अपघातात दहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आमदार संजय रायमूलकर यांचे चिरंजीव व सहकाऱ्यांनी जखमींना तातडीने भरती केले. काही प्रवाश्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. मेहकर नजिकच्या सारंगपूर येथे आज रविवारी, २८ जुलै रोजी दुपारी ही दुर्घटना घडली. सरोवर नगरी लोणार येथून क्षमतेपेक्षा जास्त जवळपास सतरा ते अठरा प्रवासी अक्षरशः कोंबून (३७ बी ६२३४ क्रमाकाची) काळी पिवळी मेहकरकडे निघाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेहकर नजीकच्या सारंगपूर नजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे काळी पिवळी भरवेगात उलटून लगतच्या खड्ड्यात पडली. या अपघातात किमान दहा प्रवासी गंभीर जखमी झाले. उर्वरित प्रवाशांना मुका मार लागला. अपघात झाल्यानंतर काळी पिवळी चालक घटनास्थळी वरून फरार झाल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : चंद्रपूर : महाराष्ट्रातील १८ ओबीसी जातींचा केंद्रीय सूचित समावेश? राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची…

या अपघाताची माहिती मिळताच मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचे चिरंजीव नीरज रायमुलकर, सागर कडभणे व त्यांचे सहकारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. त्यांनी अपघाताची माहिती मेहकर पोलिसांना दिली. तसेच घटनास्थळी १०८ रुग्ण वाहिका पाचारण करून त्यातून गंभीर जखमी प्रवाश्यांना मेहकर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तमन्ना भारत शिंदे वय ८ वर्ष, स्वाती भारत शिंदे वय ३०, दिपाली तुकाराम गायकवाड २२ वर्ष, निर्मला तुकाराम गायकवाड वय ५२ वर्ष (सर्व राहणार मालेगाव), कमल विष्णू काळे वय ६५ वर्षे( राहणार सुलतानपूर), खुशी भारत शिंदे १३ वर्ष (राहणार मालेगाव), संजीवनी प्रल्हाद शेवाळे ७० वर्ष (राहणार वेणी), दिपाली किसन बाजळ २४ वर्ष (राहणार लोणार), सायरा बी शेख अमीन ६० वर्ष (राहणार वेणी), रैसाबी शेख शमशुद्दीन वय ५५ (राहणार लोणार), अशी गंभीर जखमी प्रवाश्यांची नावे आहेत. ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वाती चव्हाण, डॉक्टर राठोड, डॉक्टर राजू डोंगरदिवे, संतोष टाले, वैद्यकीय सहाय्यक संदीप पागोरे आदींनी प्राथमिक उपचार केल्यानंतर काही गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना बुलढाणा येथे हलविण्यात आले.

हेही वाचा : ६ महिन्यांत १६६ अपघातबळी; अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातांचे…

पोलिसांचे दुर्लक्ष!

मेहकर ते लोणार ,चिखली ,सोनाटी ,रिसोड या विविध मार्गावर चालविण्यात येणारी काळी पिवळी वाहने जुनाट झाली आहे. या भंगार वाहनांमध्ये प्रवाश्याना बसण्यासाठी योग्य आसन व्यवस्था नाही. वाहनाची स्थिती बिकट असून जुन्या चाकावरच वाहन चालविण्यात येतात त्यामुळे प्रवाशांना बसताना आपला जीव मुठीत घेऊन बसावे लागत आहे. काळी पिवळी धारक क्षमातेपेक्षा जास्त लोक बसवीत असल्यामुळे अपघात वाढण्याचे प्रकार वाढले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ जुन्या वाहनावर व मुदतबाह्य वाहनची तपासणी करून कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana 10 passengers injured in jeep accident near mehkar scm 61 css