बुलढाणा: खामगाव शहरात पार पडलेल्या महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात भाजपच्या दोघा आमदारांनी (मावळते खासदार ) प्रतापराव जाधव यांना हसतहसत खडेबोल सुनावले! खासदार झालात की, तुमचे दर्शन दुर्मिळ होते, भेटीगाठीच होत नाही असे सांगून जाधवांची जाहीर गोची केली. यामुळे हा मेळावा ‘मित्रां’च्या टीकाटिप्पणीमुळेच गाजला.
बुलढाणा लोकसभेसाठी युती वा शिंदे गटाने अधिकृत घोषणा केली नसली तरी जाधव यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यामुळे त्यांनी तीन दिवसांपासून संवाद मेळावे घेण्याचा सपाटा लावला आहे. या अंतर्गत खामगाव मध्ये मेळावा घेण्यात आला. यावेळी मावळते खासदार प्रतापराव जाधव, आमदार सर्वश्री राजेंद्र शिंगणे,संजय कुटे, आकाश फुंडकर, समाज माध्यम आघाडीचे सागर फुंडकर यासह महायुतीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फुंडकर, कुटे या भाजप आमदारांनी जाधवांना पाठबळाची खात्री देतांनाच चिमटे देखील काढले.
हेही वाचा : मेळघाटात एसटी बस दरीत कोसळली; दोन महिलांचा मृत्यू, २५ जण जखमी
आमदार फुंडकर म्हणाले की, निवडणुकीनंतर खासदार जाधवांचे ‘दर्शन’ दुर्मिळ होऊन ते भेटतच नाहीत. त्यामुळे आमची विनंती आहे की, ‘महिना दोन महिन्यांतून आमच्या कार्यकर्त्यांना भेटत जा. जमलं तर खामगावात दिवसभर थांबत जा’. आमच्या हजारो कार्यकर्त्यांची ही नाराजी असल्याचे सांगून त्यांनी भाजप व मित्रपक्षाच्या कार्याकर्त्यांच्या मनातील खदखदच बोलून दाखविली. असाच सूर आमदार संजय कुटे यांनी आळविला. कार्यकर्तेच नव्हे तर आमचीही ही भावना, मागणी असल्याचे ते म्हणाले. आमदारांनाही खासदारकडे कामे असतात, केंद्राच्या योजना मार्गी लावायच्या असतात. त्यामुळे आम्हाला देखील भेटत जा, असा मार्मिक टोला त्यांनी लगावला. एकंदरीत खासदारांच्या दुर्लभ दर्शनाबाबत कार्यकर्त्यांमध्ये उमटत असलेला नाराजीचा सूर व्यक्त करून कार्यकर्त्यांच्या भावनांना या दोघांनी वाट मोकळी करून दिली.