बुलढाणा : अभिता अॅग्रो इंडस्ट्रीज व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने सिंदखेडराजा येथे आयोजित कृषी महोत्सवात ‘युवराज’ रेडा लक्षवेधी ठरला! त्याला पाहण्यासाठीच नव्हे तर त्याच्या सोबत ‘सेल्फी’ काढण्यासाठी झुंबड उडाल्याचे पहायला मिळाले. कृषी महोत्सवाची आज, सोमवारी थाटात सांगता झाली. समारोपात पशुपक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात डोणगाव (जि. बुलढाणा) येथील मूर्रा जातीचा रेडा असलेल्या ‘युवराज’ने सर्वांचे लक्ष वेधले. तब्बल ९०० किलो वजन अन् पाच फूट उंचीचा युवराज कृषी प्रदर्शनात सर्वात भारी ठरला.
डोणगाव येथील प्रयोगशील शेतकरी राजेंद्र धोगडे यांचे पुत्र कृष्णा व आशीष धोगडे यांना शेतीसोबतच अश्व, श्वान, दुग्ध व्यवसायासाठी गाय, म्हैस पालन करण्याचा छंद आहे. त्यांनी घरी मुर्रा म्हशीचा एक रेडा पाळला आहे. त्याचे नाव युवराज आहे. दोन वर्षीय युवराजचे वजन ९०० किलोपेक्षा जास्त आहे. उंची ५ फूट तर लांबी ६ फुटापेक्षा जास्त असल्याचे ‘अभिता’चे मुख्य कार्यकारी संचालक सुनील शेळके यांनी सांगितले. यावेळी दिशा बचतगट फेडरेशनच्या अध्यक्ष जयश्री शेळके हजर होत्या.
हेही वाचा : चंद्रपूर : ताडोबा बफरमध्ये वाघ मृतावस्थेत आढळला
‘युवराज’चा अचाट निर्वाह अन् आहारपत्रक
धोगडे परिवार त्याला जीवापाड जपतात. त्याच्या दिमतीला सदैव एक नोकर असतो. दिवसाला १० लिटर दूध, १० किलो ढेप, १ किलो सफरचंद, २ किलो पीठ, सोबतच दादरचा हिरवा चारा, गवत, तुरीचे कुटार, असा त्याचा आहार आहे. त्यासाठी दरदिवशी एक हजार रुपयांचा खर्च असल्याचे धोगडे यांनी सांगितले.