बुलढाणा : सध्या सुरू असलेल्या कोतवाल भरतीमधून बेरोजगारीची तीव्रता ठळकपणे दिसून आली आहे. जेमतेम १५७ पदासाठी चार हजारांवर अर्ज दाखल झाले यात शेकडोंच्या संख्येतील उच्चशिक्षितांचा समावेश आहे. दीर्घ काळानंतर कोतवाल पदासाठी का होईना शासकीय भरती होत आहे. गावातच मिळणारा रोजगार, १५ हजार रुपये मानधन आणि भविष्यात चतुर्थश्रेणी पदाच्या पदोन्नतीची संधी हे खोऱ्याने दाखल होणाऱ्या अर्जांचे कारण आहे. दोन आकडी जागासाठी खामगाव तालुक्यातून आलेले ६४९ , मेहकरमधील ५७७ अर्ज याचे मासलेवाईक उदाहरण आहे. जळगाव ३८५, बुलढाणा ३६६, शेगाव २९५, नांदुरा ३५७, लोणार २८८, मलकापूर २०३, चिखली ३०५, सिंदखेडराजा ३३१, मलकापूर २०३, संग्रामपूर १७४, मोताळा १६४, देऊळगाव राजा १२४ अशी प्राप्त अर्जांची संख्या आहे.
हेही वाचा : यावल तालुक्यात एकाच क्रमांकाचे दोन डंपर जप्त; १० ब्रास वाळूसाठाही जमा
एका जागेसाठी सरासरी २७ अर्ज !
दरम्यान १५७ जागांसाठी ४२१८ म्हणजे एका जागेसाठी सरासरी २७ अर्ज आले आहेत. कोतवाल पदासाठी इयत्ता ४ थी उत्तीर्ण ही शैक्षणिक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. मात्र बारावी, पदवीधर, डिफार्म सारखे पदविका धारक, पदव्युत्तर शिक्षण प्राप्त युवक-युवतींनी देखील अर्ज केले आहे. उमेदवार स्थानिक रहिवासी असणे बंधनकारक आहे. यामुळे ग्रामीण भागातीलही बेरोजगारीची समस्या किती गंभीर आहे हे सिद्ध होते. आता या हजारो उमेदवारांतून १५७ भाग्यवान कोण ठरतात, याचा फैसला लेखी परीक्षेनंतर होणार आहे