बुलढाणा : वाहनांची वर्दळ आणि अतिक्रमणग्रस्त परिसर असलेल्या इकबाल चौकातील अतिक्रमणे काढण्यास आज दुपारी सुरुवात करण्यात आली. यामुळे अतिक्रमण धारकांत खळबळ उडाली. परिसराला अतिक्रमणचा विळखा पडला असून चहुदिशेने होणारी वाहतूक अनेकदा ठप्प होते. यामुळे एका बालकाचा वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला होता. यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे.
जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी अतिक्रमण हटावचे आदेश दिले होते. आज दुपारी एक वाजता ही मोहीम हाती घेण्यात आली. तीन जेसीबी, दोन ट्रॅक्टर एक अग्निक्षमक दलाचे वाहन या ताफ्यासह नगर परिषदेचे कर्मचारी चौकात दाखल झाले. मुख्याधिकारी गणेश पांडे, ठाणेदार प्रल्हाद काटकर यावेळी उपस्थित होते. कडक पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू झाली. परिसरात जमलेल्या गर्दीच्या साक्षीने रस्त्यात असलेली मालवाहक लोडगाडी, प्रतिष्ठाने हटवण्यात येत आहे. अतिक्रमित जागेवर येणाऱ्या भिंतीसुद्धा जेसीबीच्या सहाय्याने तोडल्या जात आहेत.