बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदार संघासाठी जागा वाटपाच्या अंतिम चर्चेपर्यंत आग्रही राहणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाने निर्णायक टप्प्यात मोठी खेळी करीत विरोधकच काय मित्रपक्षांनाही राजकीय धक्का दिलाय! राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या बुलढाणा मतदारसंघातून ठाकरे गटाने काँग्रेस नेत्या जयश्री शेळके यांना उमेदवारी दिली. एकाच वेळी जयश्री शेळकेंच्या ‘हाता’ वर शिवबंधन बांधून त्यांच्या बुलढाण्यातील उमेदवारीवर एकप्रकारे शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार मैदानात उतरविला आहे.
अर्थात हे सर्वकाही सरळपणे झाले नसून मागील काही दिवसातील नाट्यमय घडामोडिंचा हा परिपाक आहे. आज त्याचे परिणाम दिसून आले. पडद्यामागच्या आणि बुलढाणा, मुंबई ते दिल्ली मध्ये घडलेल्या वेगवान घडामोडीचा विस्तृत तपशील प्राप्त नसला तरी प्राथमिक माहिती नुसार आजच्या पक्ष प्रवेश पूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या.
हेही वाचा : खळबळजनक! नागपुरात आठ लाखांची रक्कम जप्त, आचारसंहिता काळातील पहिली कारवाई
दरम्यान आज बुधवारी, २३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी उशिरा ‘मातोश्री’ मध्ये काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्री शेळके यांचा शिवबंधन सोहळा पार पडला. यावेळी दस्तुरखुद्द शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते तथा पश्चिम विदर्भ प्रमुख खासदार अरविंद सावंत, विनायक राऊत, सुषमा राऊत, आमदार मिलिंद नार्वेकर, बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अन्य नेत्यांनी जयश्री शेळके यांच्या हातावर शिवबंधन बांधले. बुलढाणा मतदारसंघाच्या उमेदवारी साठी अलीकडे चर्चेत असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनाही आज चर्चेसाठी बोलविण्यात आले होते. त्यांच्याशी देखील ठाकरे गटाच्या नेत्यांनी चर्चा केली. मात्र चर्चा फलदायी ठरली नाही. ठाकरे गटाच्या उमेदवारीसाठी चर्चेत आणि इच्छुक असलेले रविकांत तुपकर यांच्या नावाला जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर यांच्यासह ठाकरे गटाच्या बहुतेक पदाधिकाऱ्यांनी कडवा विरोध दर्शविला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाचे ( महा विकास आघाडीचे) उमेदवार नरेंद्र खेडेकर यांनी तर ‘लोकसभेत माझा झालेला पराभव हा केवळ अपक्ष रविकांत तुपकर यांच्यामुळे झाला आहे.अश्या माणसाला पक्षाने (उबाठा ने) उमेदवारी देणे योग्य नाही’ अश्या शब्दात आपली नाराजी बोलून दाखविली. पर्याय म्हणून तुपकर यांच्या ऐवजी जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्याची मागणी खेडेकरांनी केल्याचे समजते.यामुळे तुपकर यांच्या उमेदवारीची अगोदरच क्षीण असलेली शक्यता मावळली. कथित निवडून येण्याची क्षमता (इलेक्टिव्ह मेरिट) आणि सामाजिक समीकरण यामुळे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांची अडचण झाल्याने अखेर उमेदवारीची माळ जयश्री शेळकेंच्या गळ्यात पडली.
हेही वाचा : अंबरनाथची जागा अखेर ठाकरे गटाला, राजेश वानखेडे यांच्या नावाची घोषणा, डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरुद्ध लढणार
काँग्रेसचे प्रयत्न आणि अदलाबदल
यापूर्वी काँग्रेसने बुलढाण्याच्या जागेसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. अगदी दिल्ली मधील हाय कमांड ने देखील प्रयत्न केले.बुलढाण्याच्या बदल्यात इतर दोन मतदारसंघ सेनेला देण्याचा पर्याय दिला.मात्र उद्धव ठाकरे बुलढाण्यावर ठाम राहिले. त्यांनी उमेदवार जरूर काँग्रेसचा घेतला पण शिवबंधन बांधूनच आणि आपल्या अटी शर्तीवर! विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर च्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेचे धीरज लिंगाडे यांना उमेदवारी दिली होती. ते विजयी झाले. आता ठाकरे गटाला काँग्रेसने क्षसम उमेदवार दिला आहे. अदलाबदल ची ही मजेदार परतफेड मानली व चर्चिली जात आहे.
मेहकरमधून सिद्धार्थ खरात
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या अनुसूचित जातीं करिता राखीव विधानसभा मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाने सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी जाहीर केली आहे. स्वेच्छा निवृत्त मंत्रालय सह सचिव खरात यांनी अलीकडेच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतला होता. आज जाहीर झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या यादीत खरात यांचेही नाव झळकले आहे.