बुलढाणा : तारुण्याच्या उंबरठ्या वरील परंतु अल्पवयीन मुलीला ‘सोशल मीडिया’ आणि वयाने आपल्या पेक्षा दुप्पट असलेल्या युवकासोबतचे कथित प्रेम भलतेच महागात पडले! यात तिने स्वतःचे सर्वस्व गमावले असून तिचे आयुष्यच उध्वस्त झालंय… बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगरी या घटनेने हादरली आहे. अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मलकापुरात समोर आला आहे. आरोपी युवक सत्तावीस वर्षांचा आहे. सर्वस्व गमावल्यावर पीडितेने पालकांसह मलकापूर शहर पोलीस ठाणे गाठले. तिने आपल्यावरील अत्याचाराची हकीकत सांगितल्यावर मलकापूर पोलिसानी पोकसो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. समीर राजू देशमुख (वय सत्तावीस, राहणार दुधलगाव, तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा ) असे नराधम आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार गेल्या वर्षभरापूर्वी पीडित अल्पवयीन मुलगी आणि दुधलगावचा समीर देशमुख यांच्यात कथित मैत्री झाली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून दोघांची ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर कथित प्रेमात झाले. दरम्यान २०२४ च्या डिसेंबर महिन्यातील १२ तारखेला आरोपी तरुणाने मुलीला मलकापुरातील “हँग आऊट ” नावाच्या कॅफेत नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक अत्याचार करुन तिचे सर्वस्व लुटले …

फोटो काढले अन…

दरम्यान या घटनेनंतर पुन्हा मलकापुरातील चिंतामणी नगर भागात तरुणीवर बलात्कार झाला. आरोपी समीर याने पीडित मुलीचे नको त्या अवस्थेतील अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढले. ते समाज माध्यमावर प्रसारित (व्हायरल) करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे पीडित मुलीने तक्रार मध्ये नमूद केले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुणाविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

सायबर कॅफे की?…

दरम्यान या घटनेमुळे सायबर कॅफे पुन्हा चर्चेत आले आहे. बहुतेक सायबर कॅफे हे अय्याशीचे अड्डे झाल्याचे चित्र आहे. मलकापूर मधील घटनेने यावर पुन्हा शिक्का मोर्तब झाले आहे. यामुळे केवळ मलकापूर शहर पोलीस च नव्हे ग्रामीण आणि दसरखेड पोलिसांनी देखील आपल्या हद्धीतील सायबर कॅफे ची नियमित झाडाझडती घेणे काळाची गरज ठरली आहे. जिल्हा आणि पोलीस मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातही काही महिन्यापूर्वी सायबर कॅफे मध्ये गैरप्रकार चालत असल्याचे उघडकीस आले होते. यावर कारवाई करण्यात आली. मात्र नंतर ‘जैसे थे ‘ असेच चित्र आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी स्वतः यात लक्ष घालणे आवश्यक ठरले आहे.

Story img Loader