बुलढाणा : जिल्ह्यातील नांदुरा शहरातील साठ वर्षीय अब्दुल रहीम अब्दुल सत्तार हे नांदुरा पोलीस ठाण्यात पोहोचले. मात्र त्यांची चोरीची फिर्याद ऐकल्यावर ठाणेदारासह समस्त पोलीस कर्मचारी थक्क झाले… याचे कारण म्हणजे झालेली चोरी ही दागिने, रोख रक्कम वा वाहनाची देखील नव्हती, तर ही चोरी होती चक्क गाढवांची! कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने सहा दिवसांत एक दोन नव्हे तर तब्बल १७ गाढवे चोरून नेल्याने मालक त्रस्त झालेत. चोरी गेलेल्या गाढवांमध्ये अब्दुल रहीम यांच्या ४ तर इतरांच्या १३ गाढवांचा समावेश आहे.
हेही वाचा : काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; थेट पत्रकारांच्या कक्षातच मांडला ठिय्या….
मागील २१ ते २७ डिसेंबरदरम्यान अज्ञात चोरट्याने हा कारनामा केल्याचे त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. चोरी गेलेल्या गाढवांची किंमत अंदाजे ८५ हजार आहे. थक्क झालेल्या नांदुरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आता या १७ गाढवांचा आणि त्यांची चोरी करणाऱ्याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. नांदूराच नव्हे तर जिल्ह्याच्या गुन्हेगारी जगतात झालेली ही अफलातून चोरीची घटना खमंग चर्चेचा विषय ठरली आहे.