बुलढाणा: भारतीय संस्कृतीत गुरूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरू माऊली साक्षात ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा समकक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. याचा प्रत्यय आज रविवारी, एकवीस जुलै रोजी विदर्भ पंढरी शेगाव नगरीत दिसून आला. संत गजानन महाराजामध्ये विठुमाऊली, प्रभू रामचंद्रांना पाहणाऱ्या तसेच त्यांनाच गुरु मानणाऱ्या हजारो भाविकांची आज संतनगरीत मांदियाळी जमल्याचे दिसून आले. सन १९१० मध्ये संजीवन समाधी घेण्यापूर्वी गजानन महाराजांनी वऱ्हाड प्रांतातील हजारो शोकाकुल भक्तांना आश्वस्त केले होते. ‘मी ‘इथेच’ असेन, माझा मनापासून धावा केला तर हाकेला ओ देऊन मी तुम्हाला संकटमुक्त करेल’ अशी ग्वाही दिली होती. पिढ्यानपिढ्या भाविकांनी ही अढळ, श्रद्धा , ठाम विश्वास जोपासला. गजानन माऊलीला गुरू मानले. ही श्रद्धा उरी बाळगून गुरू पौर्णिमेला जिल्ह्यासह राज्यातील भाविक शेगावी दाखल होतात. यामध्ये पायदळ दिंड्याचाही समावेश आहे. यावर्षीही ही परंपरा कायम ठेवून हजारो भाविक शेगाव मध्ये डेरेदाखल झाले. यंदा गुरू पौर्णिमा सुट्टीच्या दिवशी ,रविवारी आल्याने गर्दी जास्त आहे. योगायोगाने शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी असल्याने काल शनिवार पासूनच अनेक भाविक शेगावी डेरेदाखल झाले. महिला भाविक, सहपरिवार आलेल्यांची संख्या लक्षणीय असल्याचे दिसून आले.
हेही वाचा : बुलढाणा: सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षाच! मुख्यमंत्र्यांना साकडे
मध्यान्ह पर्यंत गजानन महाराज मंदिर परिसर, शेगाव बस स्थानक, रेल्वे स्थानक ते मंदिर दरम्यानचे रस्ते भाविक, वाहनांनी व्यापले. मंदिर परिसर आबालवृद्ध भाविकांनी नुसता फुलून गेल्याचे चित्र होते. ‘जे जे भाविक भक्त कोणी; त्यांना अजुनी दर्शन देती कैवल्य दानी’ अशी भाविकांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे आज सकाळपासून दर्शन बारीत भाविकांच्या रांगा लागल्या. दूरवरच्या भाविकांनी मुख दर्शन घेण्यास पसंती दिली.
विजय ग्रंथाचे पारायण
आज दुपारी बारा वाजेपर्यंत हजारो भाविक समाधीस्थळी नतमस्तक झाले. हजारो भक्तांनी दासगणू महाराज लिखित विजय ग्रंथ या चरित्र ग्रंथाचे सामूहिक पारायण केले. यामुळे संतनगरी शेगावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले . या परिसरातील पायी दिंडी गुरुपौर्णिमाच्या दिवशी म्हणजेच आज सकाळपासून शेगावात दाखल हाेऊ लागल्या. भाविकांनी पहाटेपासूनच मंदिराच्या बाहेर गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी रांगा लावल्या. एकंदरीतच गुरुपाेर्णिमा निमित्त आज शेगावात उत्साहाचे वातावरण दिसून आले . गुरुपौर्णिमेच्या निमित्त शेगावला पायी वारी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय असते. आजही त्याचा प्रत्यय आला.
हेही वाचा : चंद्रपूर: चिचपल्ली येथील मामा तलाव फुटला! ३०० घरांमध्ये पाणी शिरले
सुसज्ज सुविधा
दरम्यान संत गजानन महाराज संस्थांनच्या वतीने हजारो भाविकांची संख्या लक्षात घेत सुसज्ज नियोजन केले होते. मंदिर परिसर सुशोभित करण्यात आला. शेकडो सेवेकरी मंदिर परिसरात तैनात करण्यात आले. मंदिर परिसरातील संस्थानच्या महाप्रसादालाय मधील प्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. तिथेही रांगा लागल्याचे दिसून आले. मंदिर मार्गावरील दुकानात गजानन महाराजांच्या प्रतिमा, कुंकू, गुलाल, तुळशी हार ,चंदन ,शिरणी, पेढे, पुष्पहार यांची चांगली विक्री झाली.