बुलढाणा : मागील भीमजयंती दरम्यान झालेले प्रकार लक्षात घेता यंदा बुलढाणा शहरातील भीमजयंती मिरवणूकीत सुरक्षेवर जास्त भर देण्यात आला आहे. विराट शोभा यात्रेवर कमीअधिक ३३ सिसिटीव्ही आणि वार्ड निहाय नियुक्त सुरक्षा समित्यांची करडी नजर राहणार आहे. याशिवाय मिरवणूकीत लेझर शार्पीचा वापर करण्यात येणार नाही. यंदाच्या जयंतीचे हे ठळक वैशिट्य ठरणार आहे.

राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती बुलढाणाचे अध्यक्ष निलेश राऊत, सचिव दीपक मोरे यांनी ही माहिती दिली. स्थानिय पत्रकार भवनात आज बुधवारी, ९ एप्रिल रोजी दुपारी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद ही माहिती दिली.

यावेळी त्यांनी जयंती दरम्यान आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रमाची माहिती सुद्धा दिली.यावेळी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ आराख, प्रेम इंगळे, सुरेश सरकटे, गजानन वाघ यांची उपस्थिती होती.

आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र असलेल्या बुलढाणा शहरात १४ एप्रिल रोजी निघणारी भीम जयंती ची मिरवणूकित दरवर्षी मोठी गर्दी उसळते. यामुळे मिरवणूकी निमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात येतो. मात्र पोलिसांवर मोठा ताण राहतो. यंदा मध्यरात्री बारा वाजे पर्यंत मिरवणूकीला परवानगी देण्यात आली आहे.

ही बाब आणि मागील मिरवणूकीत घडलेल्या घटना लक्षात घेता यंदा मिरवणूकीच्या सुरक्षिततेवर भर देण्यात आला. उत्साहात निघणाऱ्या मिरवणूकीला गालबोट लागू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली असल्याचे निलेश राऊत यांनी यावेळी सांगितले. शहरातील ३३ वार्डातील मिरवणूक शोभा यात्रेत सहभागी होणार आहे. या वार्डाच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या देखाव्यात प्रत्येकी एक याप्रमाणे ३३ सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे.

तसेच या वार्डाच्या सुरक्षा समित्या गठीत करण्यात आल्या आहे. या समितीत दहा जणांचा समावेश राहणार आहे. त्यांची मिरवणूकवर करडी नजर राहणार आहे. यामुळे संभाव्य गैर प्रकारांना आळा लागणार आहे, असे राऊत म्हणाले.

यंदाच्या मिरवणूकीत लेझर चा वापर करण्यात येणार नाही. तसेच ढोलताशांचा प्रथमच वापर होणार आहे. सार्वजनिक जयंती उत्सव समितीणे जय्यत तयारी चालविली आहे. यंदा देखील बुलढाण्यातील भीमजयंती महामानवांच्या ‘ विचारांचा जागर’ ठरणार आहे. परिवर्तनवादी गीते, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रबोधनात्मक व्याख्यान आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्तिक जयंती ‘समता पर्व’ म्हणून साजरा केली जाते . यंदाही विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामान्य ज्ञान परीक्षा होणार आहे. १० एप्रिल रोजी सकाळी १० वाजता स्थानिक त्रिशरण चौकस्थित सामाजिक न्याय भवन येथे ही परीक्षा पार पडणार आहे. यानंतर याच ठिकाणी, दुपारी १२ वाजता पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, सीआरपीएफ असिस्टंट कमांडर मोनिका साळवे, भारत विद्यालयाचे अरविंद पवार हे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन करतील.

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन प्रांगणात शुक्रवार, ११ एप्रिल रोजी प्रसिद्ध गायक संतोष जोंधळे यांचा परिवर्तनवादी गीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. १२ एप्रिल रोजी ज्येष्ठ संपादक तथा विचारवंत ज्ञानेश महाराज यांचे व्याख्यान होणार आहे. १३ एप्रिल रोजी गायक अजय देहाडे यांचा ‘तुफानातील दिवे’ भीम गीतांचा कार्यक्रम पार पडेल. तीनही कार्यक्रम शहरातील गांधीभवनाच्या प्रांगणात पार पडतील.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी अर्थात १४ एप्रिलला सकाळी ८ वाजता महिलांची दुचाकी रॅली निघणार असून ९ वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट, मराठा रेजिमेंट, यशसिद्धी सैनिक सेवा संघ, जिल्हा पोलीस वाद्यपथक हे वाद्यांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस मानवंदना देणार आहेत. त्यानंतर, सायंकाळी डोळ्यांचे पारणे फेडणारी शोभायात्रा निघणार आहे.