बुलढाणा : भाजपाने अतिशय विचारपूर्वक लोकसभा उमेदवारांची निवड केली असून पक्षाला आणखी ४ जागा मिळणार आहेत. त्याबाबतची घोषणा लवकरच केली जाईल. बारामतीची जागा अजितदादांच्याच गटाला जाणार आहे. पक्षाने दिलेला आदेश आम्ही पाळू, अशी माहिती भाजपाचे ज्येष्ठ नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत आज, गुरुवारी ( दि. १४) शेगाव येथे भेट दिली. गजानन महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्यावर त्यांनी प्रसिद्धी माध्यमाशी संवाद साधला. ते म्हणाले, भाजपाने अतिशय विचारपूर्वक उमेदवारांची निवड केली असून महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. लोकांचा पाठिंबा असलेल्या नेत्यांना संधी दिली आहे. आम्हाला आणखी चार जागा मिळणार असून ती यादी येत्या एक-दोन दिवसात जाहीर होईल. उमेदवार घोषणेनंतर अहमदनगरसारख्या काही ठिकाणी निर्माण झालेल्या वादाबद्दल छेडले असता, मतभेद असू शकतात. मात्र भाजपात मनभेद नाहीत. उमेदवारी घोषित होईपर्यंत सगळेच इच्छुक असतात. मात्र एकदा उमेदवारी घोषित झाली की आमच्या पक्षात विरोध राहत नसतो. नगरमध्येही सगळे एकत्र काम करतील, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखविला.
हेही वाचा : नागपूर : गोळीबार चौकाला अतिक्रमणाचे ग्रहण, चुकीच्या ‘लँडिंग’मुळे वाहतूक कोंडी
स्वत:च्या उमेदवारीबद्दल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
माझ्या उमेदवारीबद्दल पक्षश्रेष्ठी विचार करतील, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मी कोल्हापूरचा, मागे पक्षाने सांगितले पुण्यात लढा, लढलो. आताही नेते सांगतील तेच करणार, असे सूचक विधान त्यांनी केले. माझ्याकडे पुणे, बारामती आणि शिरूर मतदारसंघाची जवाबदारी असल्याचे सांगून १६ मार्चपासून तिकडे बैठका लावल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.